महाराष्ट्रातील 25 लाख इमारत बांधकाम नोंदणीचे लक्ष्य – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

0
11
मुंबई,दि.24 : महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत 25 लाख कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य कामगार विभागाने पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 23 फेबुवारीला दिले. विशेष इमारत बांधकामासह इतर कामावर हजर असलेल्या कामगारांची नोंदणीच होत नसल्याचे प्रकरण बेरार टाईम्सने 6 डिसेंबर 2017 रोजी वृत्ताच्या माध्यमातून उघडकीस आणले होते.
वर्षा निवासस्थानी आज विशेष नोंदणी अभियानाचा ई शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले तसेच वेबकास्टद्वारे नागपूरहून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व अमरावतीहून पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील या अभियानात जोडले गेले होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, इमारत बांधकाम कामगार उंच उंच इमारती तयार करण्यात आपला महत्त्वाचा सहभाग देतात. पण त्यांचे जीवन नेहमीच दुर्लक्षित राहते. आज जाहीर करण्यात आलेली अटल विश्वकर्मा सन्मान योजना महाराष्ट्रातल्या 25 लाख कामगारांपर्यंत पोहोचणार आहे.या अभियानाअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या 28 योजनांचा फायदा अधिकाधिक कामगारांनी घ्यावा, असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.
पूर्वीच्या काळी माणसांच्या रोटी, कपडा और मकान अशा तीन मुलभूत गरजा असतात असे म्हटले जायचे पण आता कालानुरुप पढाई, दवाई और कमाई यासुध्दा तितक्याच महत्त्वाच्या गरजा आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना समाविष्ट करण्याबरोबरच बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2 जून 2017 पासून लागू करण्यात आली असल्याचे श्री. फडणवीस यांनी योवळी सांगितले. 25 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करताना सर्व विभागांनी सहकार्य करावे तसेच 23 फेब्रुवारी ते 23 मार्च या 1 महिन्यात मोठ्या प्रमाणावर कामगारांची नोंदणी कशी होईल, कामगार नोंदणीमध्ये कुठला जिल्हा मागे राहणार नाही याची काळजी कामगार विभागाने घ्यावी अशा सूचनाही यावेळी केल्या.
येणाऱ्या काळात राज्याचे कामगारांची सुरक्षा आणि आरोग्य याबाबत धोरण कसे असेल याबाबतच्या धोरणाचे प्रारुप यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
यावेळी कामगारमंत्री यांनी कामगारांची नोंदणी विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, आणि अमरावती येथील 96 ठिकाणी करण्यात येत असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी संख्या वाढविण्यासाठी व त्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच बांधकाम कामगारांची नोंदणी, जमा उपकर, कल्याणकारी योजना यावर आगामी काळात भर देण्यात येणार आहे.

इमारत बांधकाम कामगारांनी विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी
• इमारत व इतर बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
• 18 ते 60 वर्षे वयोगटातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना मंडळाच्या योजनांचा लाभ घेता येणार
• इमारत व इतर बांधकाम (रोजगार, नियमन व सेवाशर्ती) अधिनियमातील मूळ व्याख्येत समाविष्ट 21 बांधकामावरील बांधकाम कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करुन विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येईल.
• विविध योजनांचा लाभ मिळविताना नोंदणी फी ठरविण्यात आली असून ती 25 रुपये इतकी आहे. तर दरमहा वर्गणी 1 रुपया आणि 60 रुपये पाच वर्षांसाठी आहे.
नोंदणीकरिता लागणारी कागदपत्रे
• गेल्या वर्षभरात 90 किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
• वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला, जन्मप्रमाणपत्र)
• पासपोर्ट आकाराची 3 छायाचित्रे
• रहिवासी पुरावा
• छायाचित्रासह ओळखपत्र पुरावा
• बँक पासबुकची सत्यप्रत
लोकप्रतिनिधी, कामगार संघटना आणि आस्थापना, स्वयंसेवी संस्था, यांनी विशेष नोंदणी अभियानात सहभागी होऊन जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी करण्यात सहकार्य करावे. तसेच विविध योजनांच्या लाभाकरिता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करण्याचे आवाहन कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांनी यावेळी केले.
यावेळी कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम, विकास आयुक्त पंकज कुमार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीरंगम आदी उपस्थित होते.