मराठी दिन कार्यक्रमात सरकारच्या गलथानपणावर अजित पवारांचा हल्लाबोल

0
8

मुंबई,दि.27- अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसरीकडे, आज मराठी भाषा दिन साजरा होत आहे. मराठी भाषा दिनानिमित्त विधिमंडळात आज सकाळी मराठी अभिमान गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. सुरेश भटांच्या गीताचे यावेळी गायन केले मात्र, त्या गीतातील शेवटचे सातवे एक कडवे वळगल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारच्या गलथान कारभारावर हल्लाबोल केला. सरकार रोजच गलथानपणा करत आहे. काल मराठी भाषेचा मुडदा पाडला तर आज मराठी दिनानिमित्त जे गीत गायले त्यातील एक कडवेच गायब करून टाकले. हा सुरेश भटांचा व मराठी भाषेचा अपमान आहे अशी टीका करत सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला.

अजित पवार म्हणाले, हे काय सुरू रोजच सरकारचा गलथानपणा पुढे येत आहे. आज मराठी भाषा दिन साजरा होत असताना सुरेश भटांच्या गीतातील एक कडवे काढून टाकले. काल मराठी भाषेत अनुवाद होऊ शकला नाही. सरकार रोज रोज चुका करत आहे. मुख्यमंत्री माफी मागून मोकळे होतात पण ज्या चुका झाल्या त्याचे काय करायचे? तसेच ज्यांनी चुका केल्या ते मोकाट फिरताहेत. यानंतर विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि जयंत पाटील यांनीही सरकारला विधानसभेत धारेवर धरले.

यानंतर सत्ताधारी भाजप व विरोधी पक्षांच्या नेत्यांत शाब्दिक खडाजंगी झाली. मुख्यमंत्र्यांनी हे गाणं पूर्वीच्या काळातील सरकारने घेतले होते तसेच आम्ही घेतल्याचे सांगितले व वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधी पक्षांनी तुम्हाला त्यात बदल करता आला नाही का असा सवाल केला. यावेळी विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला. अखेर 15 मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.