बायपासवर अपघातात तीन गंभीर;कार्य.अभियंत्याचे दुर्लक्ष

0
15

@ नगराध्यक्ष इंगळे यांची अपघात स्थळाला भेट
@  कार्यकारी अभियंत्याच्या दुर्लक्षामुळेच घडला अपघात

गोंदिया,दि.27 : जिल्हाधिकारी कार्यालय ते बालाघाट रोडवरील पांगोली मार्गावरील राजभोज चौकात आज(दि. 27) सकाळी 11.40 च्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या ट्रकने मिनी मेट्याडोरला धडक दिली. यात मेट्याडोर चालकासह तिघे जण गंभीर जखमी झाले.जखमीना तत्काळ शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.तर अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक भुजबळ यांच्यासह नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी घटनास्थळाला भेट दिली.यापुर्वी याच ठिकाणी प्रोगेसिव्ह शाळेच्या बसला एका टिप्परने धडक दिली होती,त्यावेळी सुध्दा विद्यार्थी जखमी झाले होते.त्या घटनेच्यावेळी पोलीस अधिक्षक भुजबळ यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांना घटनास्थळावरच या चौकात स्पीडब्रेकर तयार करण्यासोबतच छोटागोंदिया ते पांगोली मार्गावर अंडरपास होऊ शकते काय याची चाचपणी करण्याचे निर्देश दिले होते.त्या घटनेला पाच सहा महिन्याच्या काळ लोटल्यानंतरही बांधकाम विभागाने स्पीड ब्रेकरचे मात्र बांधकाम काही केले नाही.आज जर त्याठिकाणी स्पीडब्रेकर असते तर हा अपघात घडला नसता अशी चर्चा नागरिकात होती.

आज झालेल्या अपघातातील जखमींमध्ये शुभम शैलेश मडामे(21, रा. नावर्गाव कला), प्रवीण बबलू कुसराम(20, रा. शिवणी हट्टा) आणि आशिष शेषराव जगताप(22, रा. चुलोद) यांचा समावेश आहे.सविस्तर वृत्त असे की, एम एच 35 के 2399 क्रमांकाचे मिनी मेटाडोर चुलोद येथील जगताप डेकोरेशन यांच्या मालकीचे असून सकाळी 11.30 च्या सुमारास पांगोली नदी कडून छोटा गोंदियाच्या दिशेने येत होते. दरम्यान बालाघाट बायपास मार्गाने भरधाव वेगात येत असलेल्या अज्ञात वाहनाने धडक देऊन पसार झाला. यात मेटाडोर रस्त्याच्या खाली जाऊन उलटला. चालक आणि इतर दोघे जण गंभीररित्या जखमी झाले. माहिती होताच नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे घटना स्थळावर दाखल झाले. जखमीना केटीएस रुग्णालयात दाखल केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अपूर्व पावडे यांची भेट घेत जखमीवर त्वरीत उपचार करण्यासंबधी चर्चा केली. तसेच त्या चौकात तात्काळ गतिरोधक तयार करण्याची सूचना बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चौहान यांना केली. यावेळी पोलीस अधिक्षक भुजबळ,दुलीचंद बुध्दे, बंटी पंचबुद्धे,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील,देवेश मिश्रा आदी उपस्थित होते.