देसाईगंजचे नगरसेवक मोटवानी यांना अपात्र करण्याविषयीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे

0
8

गडचिरोली,दि.२७:अवैध बांधकामप्रकरणी देसाईगंज नगर परिषदेचे काँग्रेसचे नगरसेवक हरीश जेसामल मोटवानी यांना अपात्र करण्याविषयीचा प्रस्ताव मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठविल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.हरीश जेसामल मोटवानी हे देसाईगंज येथील नैनपूर वॉर्डातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यांचे वडील जेसामल मोटवानी यांच्या मालकीचा देसाईगंज-आरमोरी मार्गावर ‘प्रथम’ नावाचा मॉल आहे. ही इमारत जेसामल मोटवानी व नंदलाल मोटवानी यांच्या संयुक्त कुटुंबाच्या मालकीची आहे. परंतु या  इमारतीच्या काही भागाचे बांधकाम  अवैध असल्याचे लक्षात येताच देसाईगंज नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी मोटवानी यांना तीनवेळा दस्तऐवज सादर करण्याची नोटीस बजावली होती. परंतु मोटवानी हे त्या नोटिसाच्या अनुषंगाने संबंधित दस्तऐवज सादर करु शकले नाही, अशी माहिती आहे.

त्यामुळे हरीश मोटवानी हे जेसामल मोटवानी यांचे पुत्र असून, ते विद्ममान नगरसेवक असल्याने नगर परिषद अधिनियम १९६५ च्या कलम ४४ अन्वये ते अपात्र ठरु शकतात. हाच आधार घेऊन देसाईगंजच्या मुख्याधिकाऱ्यांनी हरीश मोटवानी यांना अपात्र करण्याविषयीचा प्रस्ताव जिल्हा नगर प्रशासन विभागाकडे पाठविल्याची माहिती या विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी जी.व्ही.भोयर यांनी दिली.लवकरच हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल व जिल्हाधिकारी त्यावर योग्य निर्णय घेतील, अशी माहितीही श्री.भोयर यांनी दिली.मुख्याधिकाऱ्यांनीच एखाद्या नगरसेवकास अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव सादर करण्याची ही अलिकडच्या काळातील जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे हरीश मोटवानी यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.