मुख्य बातम्या:

मृदा व जलसंधारण विभागाचा अभियांत्रिकी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

बुलडाणा ,दि.२८ : पाझर तलावात गेलेल्या शेतजमिनीचा मोबदला लवकर मिळवून देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या  देऊळगावराजा मृदा व जलसंधारण विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी  किनगाव जट्टू येथे रंगेहात अटक केली. प्रल्हाद  नामदेव पायघन असे लाच स्कीकारणाऱ्या  अधिकाऱ्याचे नाव आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव जट्टू येथील तक्रारदाराने ५ फेब्रुवारी रोजी एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. त्यामध्ये जमिनीचा मोबदला लवकर मिळवून देण्यासाठी ३० हजारांची लाच मागितल्याचे नमूद केले होते. याबाबत ५ फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली. त्यानुसार २२ फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात आला. मात्र स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रल्हाद नामदेव पायघन वय ३७ यास संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्कीकारली नाही. त्यामुळे पुन्हा २८ फेब्रुवारीला सापळा रचण्यात आला. यावेळेस पायघन याने ३० हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहात पकडले. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक नाशिककर, पोलिस उपअधिक्षक शैलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्र. बा. खंडारे, हेड कॉन्स्टेबल जवंजाळ, लेकूरवाळे, गडाख, सोळंके, लोखंडे, पवार, समीर शेख यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Share