दहावीची परीक्षा आजपासून; राज्यातील साडेसतरा लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार

0
16

पुणे,दि.१: –राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होत असून २४ मार्चपर्यंत चालणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून १७ लाख, ५१ हजार, ३५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या ९ लाख, ७३ हजार, १३४ असून, विद्यार्थिनींची संख्या ७ लाख, ७८ हजार, २१९ इतकी आहे. राज्य बोर्डाच्या नऊ विभागीय शिक्षण मंडळांच्या माध्यमातून ही परीक्षा कार्यान्वित केली जाईल.राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली. यंदा जुन्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका असतील. पुढच्या वर्षापासून अभ्यासक्रमात बदल होणार असून २०१९ मधील प्रश्नपत्रिका कृतीपत्रिकेवर आधारित असतील, असेही काळे यांनी स्पष्ट केले. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी इयत्ता बारावीच्या परीक्षेप्रमाणेच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचेही काळे म्हणाल्या.

आठ हजार दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार
राज्यभरातून यंदा दिव्यांग गटाच्या संवर्गातून एकूण आठ हजार २१ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. त्यामध्ये अध्ययन अक्षम, दृष्टिहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, कर्णबधिर, स्वमग्न, सेरेब्रल पाल्सी बाधित विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांची संख्या पुढीलप्रमाणे – औरंगाबाद ७१०, नाशिक ५१३, लातूर ४७८, अमरावती ७४३,पुणे १२२२, नागपूर ८९४, मुंबई २४६३,कोल्हापूर ७३४, कोकण २६४ व्यवसाय शिक्षणासाठी १९ हजार विद्यार्थी दहावीच्या व्यवसाय शिक्षण या विषयांतर्गत हा विषयांसाठी परीक्षा होणार असून राज्यातून त्यासाठी १९ हजार १८४ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. मल्टिस्कील फाउंडेशन कोर्स, ऑटोमोबाइल सर्व्हिस टेक्निशियन, रिटेल मर्चंटायझिंग, हेल्थ केअर, ब्यूटी अँड वेलनेस, फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्टस, टूरिझम अँड ट्रॅव्हल, अॅग्रिकल्चर, मीडिया अँड एन्टरटेन्मेंट, फंडामेंटल फायनान्स अँड बँकिंग असे विषय आहेत.

दहावी परीक्षेची वैशिष्ट्ये अशी
– जुन्या अभ्यासक्रमावरील शेवटची परीक्षा
– राज्यातील एकूण २१ हजार ९८६ शाळांतून विद्यार्थ्यांची नोंदणी
– परीक्षेसाठी राज्यभरात ४ हजार ६५७ परीक्षा केंद्रे सज्ज
– एकूण विद्यार्थी संख्येपैकी १६ लाख, ३७ हजार, ७८३ नियमित विद्यार्थी, ६७ हजार ५६३ पुनर्परीक्षार्थी तर ४६ हजार ७ इतर विद्यार्थी (खासगी, श्रेणीसुधार योजना)
– जिल्हानिहाय समुपदेशकांची व्यवस्था
– गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यात २५२ भरारी पथके