पोलिसांनी थांबविला बालविवाह

0
9

भंडारा,दि.०२ः  एका अल्पवयीन मुलीची २ लाख रुपयात विक्री करून तिचे लग्न लावत असताना पोलिसांनी धाव घेत ते लग्न थांबविले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीचे नातेवाईक, नवरदेव यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
भंडारा येथील अल्पवयीन मुलीचे लग्न पुणे येथील एका २५ वर्षीय युवकाशी शीतला माता मंदिरात होणार होते. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश घुसर यांना होताच त्यांनी पोलिस अधीक्षक विनीता साहू यांच्या आदेशाप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पोटे यांना शीतला माता मंदिर येथे पाठविले. लग्न कार्यक्र मातून नवरा मुलगा राजेंद्र नवृत्ती घुले रा. पुणे, अल्पवयीन मुलगी, तिची मानलेली मावशी व उपस्थित नातेवाईकांना ताब्यात घेऊन चौकशी करून पुढील कारवाहीसाठी शहर पोलिस स्टेशन येथे नेण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीचे होणारे लग्न थांबविण्यास विभागाला यश प्राप्त झाल्याने नागरिकांकडून विभागाचे अभिनंदन होत आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक विनीता साहू, अपर पोलिस अधिक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पोटे आणि त्यांचे पथकांनी केली आहे.