जिवंत वीजतारांच्या स्पर्शाने युवक, नीलगाय ठार

0
20

गडचिरोली,दि.02ः- वनतलावात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने शौचास गेलेला युवक व निलगाय ठार झाल्याची घटना १ मार्च रोजी  वैरागड जवळील वनतलावात घडली. सुभाष दिलीप गावतुरे (३0) रा. चिचोली ता. धानोरा असे मृतक युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक सुभाष गावतुरे आणि एकलव्य विद्यालयात काम करणारे पाच मित्र एकल विद्यालयाच्या बैठकीसाठी धानोर्‍यावरून वैरागडमार्गे तीन दुचाकी वाहनाने ब्रम्हपुरीला जात होते. वैरागड ओलांडून चार किमी अंतरावर आरमोरी मार्गावर असलेल्या पाण्याची टाकी म्हणून ओळखल्या जाणार्‍या वनतलावाजवळ पोहचले. सुभाष गावतुरे याने दुचाकी चालवित असलेल्या शिवरतन वट्टी या आपल्या मित्राला शौचास लागल्याचे सांगितले. त्यामुळे तलावाजवळ दुचाकी थांबविण्यात आली. सुभाष गावतुरे हा शौचास गेला. त्याचा मित्र शिवरतन दुचाकीजवळ थांबून होता. दरम्यान मृतक सुभाषने त्याच्या मित्राला भ्रमणध्वनी करून तलावाच्या दुसर्‍या बाजुला पाण्याजवळ निलगायीचा मृत्यू झाला आहे, तू पाहण्यास ये! असे सांगितले. त्यानंतर मृतक सुभाष पुढे निघून गेला. आधीच विद्युत स्पर्शाने ठार झालेल्या निलगायीजवळ जाताच त्याच तारांचा स्पर्श झाल्याने सुभाष जागीच ठार झाला.
मृतक सुभाषने भ्रमणध्वनीवर सांगितल्याप्रमाणे त्याचा मित्र तलावाच्या दिशेने गेला. मात्र बघतो तर सुभाष तडफडत दिसला. त्यांच्यासोबत असलेली दुसरी दुचाकी पुढे गेली होती. एक दुचाकी मागे होती. शिवरतने लगेच भ्रमणध्वनी करून मित्रांना बोलाविले व घडलेला सर्व प्रकार सांगितला. जिवंत विद्युत तारा इतरत्र विखुरलेल्या असल्याने त्यांचा नाईलाज झाला. तरी सर्व मित्रांनी समयसूचकता दाखवून एका लांब काठीने जिवंत तारा दूर केल्या आणि सुभाषला पाणी पाजले. मात्र सुभाषने प्राण सोडले.
घटनेची माहिती मिळताच वैरागड येथील विद्युत कंपनीचे कनिष्ठ अभियंता भोवरे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी पोहोचले. प्रथम विद्युत पुरवठा करण्यात आला. वासाळा बिटचे क्षेत्र सहाय्यक के. बी. उसेंडी, वनरक्षक एच. जी. झोडगे, श्रीकांत सेलोअे, बोपचे, आरमोरीचे पोलिस निरीक्षक महेश पाटील, वैरागडचे बिट जमादार जे. एस. शेंडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आरमोरी येथे पाठविला. अवैध शिकार्‍यांनी लाकडाच्या खुंट्या गाडून संपूर्ण तलावाभोवती जिवंत विद्युत तारा गुंफल्या होत्या.