असरअली संघाने जिंकला बिरसा मुंडा व्हॉलीबॉल चषक

0
144

गडचिरोली,दि.04ः- गेल्या एक महिन्यापासून अतिशय रंगतदार सामन्यांनी गाजलेला बिरसा मुंडा  व्हॉलीबॉल चषक आज असरअली संघ,उपविभाग सिरोंचा यांनी जिंकला.पोलीस मुख्यालय,गडचिरोली येथे असरअली संघ आणि धानोरा संघ यांच्यात शनिवारला झालेल्या अंतिम सामना अत्यंत चुरशीने खेळला गेला. तब्बल १ तास ४०मि. रंगलेल्या या सामन्यात पहिला सेटमध्ये सिरोंचा संघाला २५-२३ असा निसटता विजय मिळाला.दुसरा सेट मध्ये जोरदार प्रतिहल्ला करून धानोरा संघाने सिरोंचा संघावर २५ -१४ या अंतराने जिंकत आपले आव्हान कायम केले.तिसऱ्या व निर्णायक सेट मध्ये मात्र सिरोंचा संघाने धानोरा संघाचा १५-१० गुण मिळवून बिरसा मुंडा चषकावर आपले नाव कोरले.  धानोरा संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.तिसऱ्या स्थानासाठी उपविभाग गडचिरोली आणि उपविभाग जिमलगटा या दोन संघामध्ये लढत होउन उपविभाग गडचिरोली संघाने बाजी मारली.
अजिंक्य ठरलेल्या असरअली संघास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रुपये २५००० रोख आणि बिरसा मुंडा चषक बिरसा मुंडा यांचे नातू सुखराम मुंडा व बुधराम मुंडा यांच्या हस्ते प्रधान करण्यात आले.उपविजेता संघास रुपये २०००० रोख व चषक मा.प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी सो यांच्या हस्ते देण्यात आले तर गडचिरोली उपविभागास तृतीय क्रमांकाचे १५००० रोख व चषक मा. अप्पर पोलिस अधिक्षक  डॉ. हरी बालाजी सो यांच्या हस्ते देण्यात आले.
२६ जानेवारी २०१८ पासून खेळल्या गेलेल्या व अत्यंत यशस्वी ठरलेल्या  या स्पर्धेत तब्बल ७५८ संघानी तसेच ९०९६ खेळाडूंनी  भाग घेतला होता.संपूर्ण स्पर्धा अतिशय चुरशीने खेळली गेली दुर्गम अतिदुर्गम भागातील तरुणांच्या कलागुणांना वाव मिळावा व गडचिरोलीतून भविष्यातील मोठे खेळाडू निर्माण व्हावे यासाठी मा.पोलीस अधिक्षक. डॉ.अभिनव देशमुख सो यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.