अदानी प्रकल्पाच्या कामगाराचा मृत्यू संशयास्पद

0
9

कामगार संघटनेचे उपाध्यक्ष पवन मोरे यांनी व्यक्त केला संशय

गोंदिया,दि.04ः- तिरोडा  येथील अदानी प्रकल्पात कार्यरत एका कर्मचार्याचा २ मार्च रोजी मृत्यू झाला़ असून त्या कामगाराचा मृत्यू हा अदानी प्रकल्पात काम करतानाच झाल्याचा संशय श्रमिक कामगार संघटनेचे उपाध्यक्ष पवन मोरे यांनी व्यक्त केला आहे.सोबतच तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत आकस्मिक मृत्यूची केलेली नोंद संशयास्पद असल्याने या प्रकरणात सखोल चौकशी करुन मृत कामगाराच्या कुटूबिंयाना मोबदला मिळावा अशी मागणी केली आहे.दरम्यान अदानी समुहाने मात्र सदर कामगाराचा मृत्यू हा कामावर झाला नसून त्याच्या निवासस्थानी झाल्याचे म्हटले आहे.

सविस्तर असे की, कोलकाता येथील मूळ रहिवासी असलेले अभिजित कालीपत आईच (४४) यांना २ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजेच्या दरम्यान तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता आणले असता कार्यावर हजर असलेले वैद्यकिय अधिकारी डॉ. अख्तर यांनी तपासणी करुन सदर इसमाचा मृत्यू आधीच झाल्याचे सांगितले.तशी माहिती तिरोडा पोलीसांनी दिली.त्यानंतर तिरोडा पोलीसांनी याप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली़ असून तपास हवालदार मनोहर अंबुले यांना देण्यात आले.मृतक अभिजित हा मूळ कोलकात्याचा रहिवासी असून अदानी प्रकल्पात कामावर होता.तो सहकार नगर तिरोडा येथे भाड्याने राहायचा,त्याला २ मार्च रोजी अदानी प्रकल्पातील काही व्यक्तींनी उपजिल्हा रुग्णालयात सायंकाळी ८ वाजेच्या दरम्यान उपचाराकरिता आणले असता डॉक्टराने मृत झाल्याचे सांगितले. याबाबत अदानी प्रकल्प श्रमिक संघटनेचे उपाध्यक्ष पवन मोरे यांनी वरील कामगाराचा मृत्यू अदानी प्रकल्पातच झाल्याची शंका व्यक्त केली असून या कामागाराच्या परिवारास नियमानुसार मदत देण्याची मागणी केली आहे.तपास अधिकारी अंबुले यांनी सदर कामगाराचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियाना सोपविण्यात आले असून आज सायकांळच्या सुमारास कोलकत्ता येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याचे कुटुबियांच्या माहितीच्या आधारे सांगितले.