तथागत बुद्धांचा धम्म हा जगाला तारणारा-बडोले

0
31

साकोली,दि.05 : प्रज्ञा म्हणजे ज्ञान, असे ज्यातून दु:खाच्या कारणाचा बोध होतो. दु:खाचे कारण दुर केले की दु:ख दुर होते. माझ्या दु:खाला मीच जबाबदार आहे. मीच ते निर्माण केले आहे आणि मलाच ते दुर करावे लागेल. याचा बोध त्याला होतो. बुध्दांनी पंचशिल दिलेले आहे, त्याचे पालन करावे. तथागत बुद्धांचा धम्म हा जगाला तारणारा आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. आलेबेदर येथे आयोजित बुध्द भिमगीतांचा जलसा कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी साकोलीच्या नगराध्यक्ष धनवंता राऊत या होत्या. अतिथी म्हणून महाराष्टÑ शासन पुरस्कार प्राप्त डी.जी. रंगारी, राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुध्द शेवाळे, पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार, सुभाष कोइारे, मनोज कोटांगले, भावेश कोटांगले, संचालक रोशन बडोले, प्राचार्य डी. जी. मळामे, डॉ. अजय अंबादे, दिपक मेश्राम, गायक सुर्यकांता पाटील आदी मंचावर उपस्थित होते.
ना. बडोले म्हणाले, शील म्हणजे नियम, समाजात कसे वागावे याचे नियम समाजामध्ये अशी व्यवस्था निर्माण व्हावी जिचा मुळाधार हा न्याय, समता, व्यक्तीस्वातंत्र्य आणि समान संधी हा असेल. शिलपालनाचा आणि मनाचा खुप जवळचा संबंध आहे. कारण मनावर ताबा असला तरच शिल पाळता येते. एखाद्या व्यसनातुन बाहेर पडावे, असे त्याला वाटत असते पण मनावर ताबा नसल्यामुळे तो परत परत त्या चक्रात अडकला जातो. मनावर संयम मिळविण्याकरिता गौतम बुध्दाने समाधीचा पुरस्कार केला अशी समाधी शिकविली. जीचा मुळाधार निसर्गनियम आहे. श्वास आणि संवेदनावर आधारित साधना शिकविली. जी साधना कोणताही माणुस सहन करु शकतो. त्यातुन मन एकाग्र होते आणि मनावर ताबा येतो.
डी. जी. रंगारी यांनी प्रास्ताविकातून, आलेबेदर येथील त्रिरत्न बौध्दविहार येथे वर्षभर कसे विविध उपक्रम राबविले जातात व माणुस बनविण्याचा ठिकाण आलेबेदर आहे. येथुनच धम्मज्ञान उपासक घेऊन जातात असे सांगितले. त्यानंतर सर्वच गायकांनी भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर संगीतातून प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन शीलकुमार वैद्य यानी तर आभार कव्वाल मनोज कोटागले यांनी केले.