‘आमदाराची पोरगी काय म्हणते, कंत्राटी नवरा नाय म्हणते…’

0
44

गडचिरोली, दि.६ :: कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे, ९ फेब्रुवारीचे परिपत्रक रद्द करावे या व अन्य मागण्यांसाठी आज राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

कंत्राटी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष वकील खेडकर, सचिव प्रशांत बांबोळे यांच्या नेतृत्वात दुपारी साडेबारा वाजता इंदिरा गांधी चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. नोकरीत कायम करा, ९ फेब्रुवारी २०१८ चे परिपत्रक रद्‌द करा अशी विधाने असणाऱ्या टोप्या घालून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. या मोर्चात जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत एनआरएचएम, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, शिक्षण विभाग तसेच अन्य अशा १९ विभागातील स्त्री व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘आमदाराची पोरगी काय म्हणते, कंत्राटी नवरा नाय म्हणते’, ‘एकच नारा कायम करा,’ ‘रद्द करा रद्द करा, जाचक परिपत्रक रद्द करा’, या ना-यांसोबतच ‘सरकारला आमचं सांगण हाय, २०१९ ला निवडणूक हाय’ असा सूचक इशारा देणारा नाराही संपूर्ण मोर्चादरम्यान लावला जात होता. गडचिरोली शहराच्या इंदिरा गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा भर उन्हात ३ किलोमीटर पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे नेते रोहिदास राऊत, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कावडकर, जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस.वाय.खरवडे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन संबोधित केले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत असून, शासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा यावेळी देण्यात आला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी धरणे आंदोलन करुन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. विशेष म्हणजे, शेकडो कंत्राटी कर्मचारी या मोर्चात सहभागी झाल्याने आज विविध विभागांची कार्यालये ओस पडली होती. शिवाय कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामकाज प्रभावीत झाले होते.