नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा गौरव

0
10

नागपूर,दि.७ : भारतीय लोकप्रशासन संस्थेद्वारे दिल्या जाणारा स्वर्गीय एस. एस. गडकरी मेमोरियल इनोव्हेशन अवॉर्ड जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना जाहीर करण्यात आला. लोक प्रशासनामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत स्पीड पोस्टद्वारे ‘डायरेक्ट टू होम’ प्रमाणपत्र ४८ तासांच्या आत उपलब्ध करून देण्याच्या राज्यातील पहिल्या उपक्रमाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
शासन आपल्या दारी या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जनतेला प्रशासनातर्फे दिले जाणारे प्रमाणपत्र नेमून दिलेल्या वेळेपेक्षा कमी दिवसांच्या आत घरपोच पोस्टसेवेद्वारे उपलब्ध करून देण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेऊन यावर्षीचा पुरस्कार जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेतर्फे जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मुंबई येथे १६ मार्च रोजी विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
‘डायरेक्ट टू होम’ या उपक्रमांतर्गत १६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत ८२ हजार ४९ प्रमाणपत्रांचे घरपोच वितरण पूर्ण झाले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची राज्यस्तरावरही दखल घेण्यात आली असून, भारतीय लोक प्रशासन संस्थेद्वारे दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल राज्यस्तरावर दिल्या जाणाºया स्वर्गीय डॉ. एस. एस. गडकरी मेमोरियल अवॉर्ड फॉर इनोव्हेशन इन पब्लिक अ‍ॅडमिनीस्ट्रेशन २०१७ या पुरस्कारासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची निवड केली आहे.