भूमिअभिेलख उपअधीक्षक एसीबीच्या जाळ्यात

0
10

गडचिरोली,दि.७: पूर्वजांनी खरेदी केलेल्या जमिनीची दस्तऐवजात असलेली चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी वारसदाराकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज गडचिरोली येथील भूमिअभिेलख कार्यालयातील उपअधीक्षकास रंगेहाथ पकडून अटक केली. वारलु श्रावण कामतवार(५८), असे उपअधीक्षकाचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा एटापल्ली तालुक्यातील घोटसूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक असून, त्याच्या पूर्वजांनी १९४४ मध्ये गडचिरोली शहरातील रामपुरी वॉर्डात जमीन खरेदी केली होती. पुढे १९७२-७३ मध्ये भूमिअभिलेख कार्यालयातर्फे गावठाण जमिनीची मोजणी करण्यात आली. परंतु कार्यालयीन दस्तऐवजात या जमिनीची नोंद चुकीने दुसऱ्याच्या नावाने करण्यात आली. त्यामुळे तक्रारकर्ता हा सध्याचा वारसदार असल्याने त्याने चुकीच्या नोंदीत दुरुस्ती करुन आपल्या आजोबाच्या नावाची नोंद व्हावी, यासाठी गडचिरोलीच्या भूमिअभिेलख कार्यालयात २२ जून २०१७ रोजी अर्ज केला होता. त्याअनुषंगाने तक्रारकर्ता हा वारंवार भूमिअभिलेख कार्यालयात जाऊन आपल्या प्रकरणाविषयी विचारपूस करीत होता. परंतु या कार्यालयाकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

तक्रारकर्त्याने भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक वारलु कामतवार यांची भेट घेतली. परंतु त्यांनी गडचिरोली शहरातील सिट क्रमांक १ नमुना क्रमांक २११९ या मालमत्तेवरील चुकीच्या नोंदीची दुरुस्ती करुन देण्याकरिता तक्रारकर्त्याला ६ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती अर्धी रक्कम ३ हजार रुपये स्वीकारण्यास तो तयार झाला.मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज गडचिरोली येथील भूमिअभिलेख कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. यावेळी उपअधीक्षक वारलु कामतवार यांनी तक्रारकर्त्याकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाले. यावरुन एसीबीने वारलु कामतवार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७,१३(१)(ड) व १३(२) अन्वये गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

एसीबीचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय माहुलकर, पोलिस उपअधीक्षक रोशन यादव, डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, शिपाई रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, महेश कुकडकर, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, सोनल आत्राम, सोनी तवाडे, तुळशीदास नवघरे यांनी ही कारवाई केली.