नवेगाव बांध मत्स व्यवसाय सहकारी संस्थांना दिलासा

0
16

पालकमंत्र्यांनी मांडली मत्स व्यवसायीकांची बाजू

गोंदिया, दि. 8 ः गोंदिया जिल्ह्यातील ज्या गावातील मालगुजारी तलावाची क्षमता 1 हजार हेक्टरपेक्षा कमी असेल आणि तेथे केवळ एकच मत्स व्यवसाय सहकारी संस्था नोंदणीकृत असेल तर अशा मालगुजारी तलावातील मासेमारीचा ठेका त्याच स्थानिक मत्स व्यवसाय सहकारी संस्थेला देण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही, राज्याचे पशु संवर्धन, दुग्धोत्पादन आणि मत्स व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी नवेगावबांध मत्स व्यवसाय सहकारी संस्थेच्या शिष्टमंडळा आज दिल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधीमंडळातील आपल्या दालनात दिली.
गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध येथील मालगुजारी तलावात पारंपारिक पध्दतीने मासेमारी करण्याचे शासनाचे धोरण होते. त्यावर स्थानिक नवेगावबांध मत्स व्यवसाय सहकारी संस्थेचे चारशे सभासद आणि सुमारे दोन हजार कुटूंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र अलिकडे एका शासन निर्णयानुसार या पारंपारिक मासेमारी धोरणात बदल झाला होता. नव्या शासन निर्णयामुळे मत्स व्यवसायी कुटूंबावर उपासमारीची वेळ आल्याचे सभासदांचे म्हणणे आहे. ही बाब सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी संस्थेच्या शिष्टमंडळासह पदुम मंत्री महादेव जानकर यांच्या निदर्शनास आणली. त्यावेळी नवा शासन निर्णय तातडीने रद्द करण्यात येईल, तसेच एक हजार हेक्टर क्षमता असलेल्या मालगुजारी तलावात आणि सदर गावात एकच मत्स व्यवसाय सहकारी संस्था नोंदणीकृत असल्यास त्याच संस्थेला मासेमारीचा ठेका देण्यात येईल, असे जानकर यांनी बडोलेंकडे स्पष्ट केले.
नवेगावबांध येथील मालगुजारी तलावात पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांना पदुम मंत्र्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे मोठा दिलासा मिळाला असल्याचे गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री बडोले यांनी सांगितले,तर आमच्या पालक मंत्र्यांनी आमचा प्रश्न पदुम मंत्र्यांकडे सतत लावून धरल्यामुळेच खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय  मिळाला. त्यामुळे आम्ही फार समाधानी आहोत, अशा शब्दात शिष्टमंडळातील सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.आज सामाजिक न्याय आणि विशेष मंत्री राजकुमार बडोले यांच्या दालनात पदुम मंत्री महादेव जानकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नवेगावबांध मत्स व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम मेश्राम, उपाध्यक्ष विनायक कोल्हे, विश्वनाथ मेश्राम तसेच हरिदास कांबळे उपस्थित होते.