अमरावतीच्या कन्येने माऊंट किलिमंजारोवर रोवला राष्ट्रध्वज

0
14

अमरावती,दि.08(विशेष प्रतिनिधी : दक्षिण आफ्रिकेच्या माऊंट किलिमंजारो शिखरावर विदर्भातील पहिली महिला वैमानिक अमरावतीची प्रियंका राजेश सोनी हिने बुधवार ७ मार्च रोजी भारताचा राष्ट्रध्वज रोवला. आठ दिवसांत सर्वांत कठीण मार्गाने १९ हजार ३४१ फूट उंचीचे जगातील चौथ्या क्रमांकाचे शिखर सर करून परतण्याचा गौरव तिने मिळविला आहे.
तिने हिमाचल प्रदेशातील नेहरू इन्स्टिट्यूट आॅफ माऊंटेनीअरिंगमधून प्रशिक्षण घेतले. यानंतर हिमालयातील माऊंट कमानो, हिमकुंड साहेब, मचहर, स्टॉक कांगरी ही शिखरे सर केली.त्यानंतर तिचे लक्ष्य होते दक्षिण आफ्रिकेतील माऊंट किलीमंजारो.हे शिखर सर्वोच्च सातपैकी चौथ्या क्रमांकावर असून, चहुबाजूंनी सुप्त ज्वालामुखींनी वेढलेला आहे. तिने निवडलेला मार्ग हा सरळसोट चढाईचा होता. त्यातच तापमान उणे २० ते ३० अंशाच्या आसपास तापमान होते. अशा स्थितीत आठ दिवसांत शिखराची चढाई करून परतण्याची किमया प्रियंकाने केली आहे. १ ते ७ मार्च दरम्यान ही गिर्यारोहण मोहीम आखली होती. यात सुमारे २५ देशांतील प्रतिनिधी सहभागी झाले होते. मात्र, थंड हवामानाचा धसका घेऊन अनेकांनी माघार घेतली. प्रियकांने मात्र त्याची तमा न बाळगता माऊंट किलीमंजारोवर भारताचा राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने रोवला.
प्रियंका ही इंडिगो एअरलाइन्समध्ये महिला वैमानिक म्हणून कार्यरत आहे. अमेरिकेच्या मियामी शहरात तिने वैमानिकांसाठी आवश्यक अभ्यासक्रम (सीपीएल) पूर्ण केला, तर जर्मनीच्या ब्रुसेल्स शहरातून एटीपीएल  मिळविले.