अस्मिता ही महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी योजना – मुख्यमंत्री

0
6

स्वस्त सॅनिटरी पॅडसाठी अस्मिता योजनेचा शुभारंभ

मुंबई दि.८ :: महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देणारी अस्मिता योजना ही महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी योजना आहे. या योजनेतून मोठा सामाजिक बदल होईल. तसेच मासिक पाळी, सॅनिटरी पॅडसारख्या बाबींसंदर्भात महिलांमध्ये असलेला संकोच कमी होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास आणि आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
ग्रामविकास विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या अस्मिता योजनेचा आज मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चित्रपट अभिनेते अक्षय कुमार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पदुम मंत्री महादेव जानकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, महिला- बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, ग्रामविकास सचिव असीम गुप्ता, महिला-बालविकास सचिव विनीता सिंगल, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, येस बँकेच्या सिनिअर प्रेसिडेंट रिंकी ढिंगरा आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, अस्मिता योजनेची आखणी ही लक्ष्य निर्धारित (Targeted) आणि डिजिटल बेस केल्यामुळे एकही पात्र मुलगी सॅनिटरी पॅडपासून वंचित राहणार नाही. तसेच कोणीही या योजनेचा दुरुपयोग करु शकणार नाही. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशात क्रांतिकारी ठरावी, अशी अस्मिता योजना ग्रामविकास विभागाने सुरू केली आहे. अभिनेते अक्षयकुमार यांनी आधी शौचालयासंदर्भात आणि आता मासिक पाळीसंदर्भात चित्रपट काढून मोठे सामाजिक योगदान दिले आहे. अक्षयकुमार यांनी जलयुक्त शिवारसाठीही ५१ लाख रुपयांचे योगदान दिले होते. ३१ मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळांमध्ये पॅडमॅन चित्रपट दाखवण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. यातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल. अस्मिता योजनेमुळे महिलांमधील मासिक पाळीसंदर्भातील संकोच कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अस्मिता योजनेच्या संकल्पनेपासून कार्यान्वयनापर्यंत मंत्री पंकजा मुंडे यांनी बारकाईने लक्ष दिले. राज्यातील महिलांना एक चांगली योजना दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे यांचे अभिनंदन केले. लोकांनी अस्मिता फंडसाठी मदत करुन जास्तीत जास्त मुलींसाठी अस्मिता स्पॉन्सरशीप स्वीकारावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.