विवो स्मार्टफोनमध्ये असेल २४ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा

0
6

विवो कंपनी भारतीय ग्राहकांसाठी लवकरच विवो व्ही ९ हा स्मार्टफोन लाँच करणार असून यात तब्बल २४ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. विवो कंपनीने गत नोव्हेंबर महिन्यात भारतीय बाजारपेठेत आपले व्ही ७ हे मॉडेल लाँच केले होते. यानंतर या कंपनीने कोणताही स्मार्टफोन सादर केलेला नाही. या पार्श्‍वभूमिवर, विवो कंपनी २७ मार्च रोजी भारतीय ग्राहकांसाठी नवीन मॉडेल सादर करणार आहे. या लाँचींग कार्यक्रमाचे प्रसारमाध्यमांना निमंत्रणदेखील पाठविण्यात आले आहे.

याचे विवो कंपनीतर्फे टिझर्सदेखील लाँच करण्यात आले आहेत. यातून या आगामी मॉडेलविषयी बर्‍यापैकी माहिती जगासमोर आली आहे. विवोच्या अनेक मॉडेल्समध्ये उत्तम दर्जाचे सेल्फी कॅमेरे असल्याचे आधीदेखील आपल्याला दिसून आले आहे. आधीच्या व्ही ७ या मॉडेलमध्येही २४ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला होता. या अनुषंगाने व्ही ९ या स्मार्टफोनमध्येही इतक्याच क्षमतेचा अर्थात २४ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. तर याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. यात नेमक्या किती मेगापिक्सल्सचे कॅमेरे असतील याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.

विवो व्ही ९ या स्मार्टफोनचा लूक हा आयफोन-एक्स या मॉडेलप्रमाणे फुल व्ह्यू या प्रकारातील असेल असे मानले जात आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे असेल. विवो कंपनीने अन्य फिचर्ससह मूल्याची माहिती दिलेली नाही. मात्र विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार याचे मूल्य २५ हजार रूपयांच्या आसपास असू शकते.