आठ हजार महिलांनी साकारले ‘बेटी बचाओ’

0
20

वाशीम ,दि.09- जिल्ह्यातील महिला, मुलींनी (दि. ८) आंतरराष्ट्रीय महिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून विश्‍वविक्रमात नोंद केली. त्यामुळे जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर पोहचले. वाशीम जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात सहभागी होत जिल्ह्यातील आठ हजार ३१८ महिला-मुलींनी मानवी साखळीतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारला. ८-३-२०१८ या तारखेचे औचित्य साधून साकारण्यात आलेल्या लोगोमागे स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृती करण्याचा उद्देश होता. केवळ महिला व मुलींनी इतक्‍या मोठ्या संख्येने एकत्र येऊन मानवी साखळीतून अशा प्रकारचा जगात पहिल्यांदाच लोगो साकारला गेल्याने या उपक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌ने घेतली आहे.स्त्री-भ्रूणहत्या रोखणे तसेच मुलींना शिक्षण व समान संधी मिळण्यासाठी समाजाचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा याकरिता जिल्ह्यात बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राबवले जात आहे. या अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारला. त्यानुसार येथील पोलिस कवायत मैदानावर  झालेल्या कार्यक्रमात महिला व मुलींनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’चा संदेश दिला.