लोककल्याणासाठी सोशल मिडियाचा वापर व्हावा- प्रविण महिरे

0
10

महामित्र उपक्रमाअंतर्गत संवाद सत्र
ङ्घ सहभागी महामित्रांना भेटवस्तू वितरण

गोंदिया,दि.१० : आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. प्रिन्ट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि आता सोशल मिडिया असा प्रवास माध्यमांचा आहे. सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून लोककल्याणासाठी या मिडियाचा वापर झाला पाहिजे. असे मत निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी व्यक्त केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोशल मिडिया महामित्र या उपक्रमाअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने चार संवाद सत्राचे आयोजन आज ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले. संवाद सत्रानंतर सहभागी महामित्रांना भेटवस्तू देतांना आयोजित कार्यक्रमात श्री.महिरे बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे,राजन चौबे, सतीश मार्कंड, लेखाधिकारी एल.एस.बाविस्कर, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अंकेश केदार, प्रा.बबन मेश्राम, प्रा.कविता राजाभोज, अनुलोम संस्थेचे सतीश ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.महिरे म्हणाले, महामित्रच्या माध्यमातून सोशल मिडियाचा एक प्लॅटफार्म उपलब्ध झाला आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. हया योजना सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सोशल मिडियाचा सकारात्मक वापर केल्यास विकासाला गती मिळण्यासोबतच विवेकी समाज निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी श्री.खडसे यांनी संवाद सत्रामागची भुमिका विशद केली. संवाद सत्रात सहभागी झालेल्या महामित्रांना संदर्भमुल्य असलेली महाराष्ट्र वार्षिकी हे पुस्तक, लोकराज्य मासिक, आपला जिल्हा पुस्तिका, नववर्षाचे टेबल कॅलेंडर व सारस पक्षाची माहिती असलेली घडिपुस्तिका भेट म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. परीक्षक म्हणून संजय भावे, सुनिल पटले, अशोक शेंडे, श्री.बावणकर, प्रा.बबन मेश्राम, डॉ.सुवर्णा हुबेकर,राजन चौबे, एल.एस.बाविस्कर,  अंकेश केदार यांनी तर निरीक्षक म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, प्रा.कविता राजाभोज, सतीश मार्कंड, के.के.गजभिये यांनी काम पाहिले. उपस्थितांचे आभार अनुलोम संस्थेचे सतीश ठाकरे यांनी मानले.