सिरोंचात डायनासोरचे ‘जीवाष्म संग्रहालय’

0
17

गडचिरोली,दि.10 : जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा तालुक्यात १६० दशलक्ष वर्षापूर्वीचे डायनासोरचे अवशेष तीन वर्षापूर्वी मिळाले होते. त्याचा आधार घेत सिरोंचाजवळ डायनासोरचे जीवाष्म संग्रहालय बनविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शुक्रवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी ५ कोटी रुपयांची घोषणा करून त्यावर शिक्कामोर्तब केले.
राज्यभरात कुठेच अशा प्रकारचे जिवाष्म संग्रहालय नाही. त्यामुळे हे संग्रहालय गडचिरोली जिल्ह्याला नवीन ओळख देणारे ठरणार आहे. सिरोंचा तालुका मुख्यालयापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या वडधम येथे हे जिवाष्म संग्रहालय होऊ घातले आहे. या संग्रहालयाच्या निर्मितीनंतर जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढण्यासोबतच रोजगारही वाढेल, असा विश्वास पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केला.
नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या सिरोंचा तालुक्यात डायनासोरसोबत मासोळ्यांचेही अवशेष आहेत. अमेरिकेवरून आलेल्या काही वैज्ञानिकांनीही याला दुजोरा दिला आहे. सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली, चिटूर आणि बोरगुडम येथे डायनासोर, मासोळ्या आणि जुन्या वृक्षांचे अवशेष सापडले आहेत. या सर्वांचे जतन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.