भारती विद्यापीठाकडे निघाले पतंगरावांचे पार्थिव, 4 वाजता सांगलीमध्ये होणार अंत्यसंस्कार

0
6

पुणे(विशेष प्रतिनिधी),दि.10 –माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे शुक्रवारी दीर्घ आजारामुळे निधन झाले. राज्यात शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी झटणाऱ्यांमध्ये कदम यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. पतंगरावांचे पार्थिव त्यांच्या सिंहगड बंगल्यातून भारती विद्यापीठ परिसराकडे निघाले आहे. याठिकाणी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवले जाईल. काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते त्यांच्या या अंतिम प्रवासात सहभागी झाले आहेत.थोड्याच वेळात पतंगराव कदम यांचे पार्थिव पुण्यातील भारती विद्यापीठ शैक्षणिक परिसरामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पुण्यातील कार्यकर्त्यांना याठिकाणी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. दुपारी 12 वाजेपर्यंत या ठिकाणी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

त्याआधी पतंगराव कदम यांचे पार्थिव सकाळी सात वाजेच्या दरम्यान पुण्यात पोहोचले. त्यांच्या सिंहगड बंगल्यावर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सकाळीच पतंगराव कदम यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्याशिवाय काँग्रेसच्या आमदार आणि सुशिलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांनीही पतंगराव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. पुण्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते सुरेशकुमार कलमाडी यांनीही सकाळीच कदम यांच्या सिंहगड बंगला येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

सांगलीत होणार अंत्यसंस्कार
कदम यांच्या पार्थिवावर सांगलीतील वांगीमध्ये असलेल्या सोनहिरा साखर कारखाना परिसरात अंत्यसंस्कार होणार आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातून 12 वाजता पार्थिव सांगलीकडे रवाना होईल. येथे वांगीतील साखर कारखान्यात काही वेळ अंत्यदर्शन आणि 4 वाजेत्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.