विकासाकरिता वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही : श्रीहरी अणे

0
8

१९ मार्च रोजी दिल्लीत आंदोलन
गोंदिया,दि.10-  वेगळा विदर्भ करण्याच्या नावावर जिंकून आलेल्या सत्तारूढ पक्षाला वेगळे विदर्भ राज्य द्यावा, अशी मुळीच इच्छा नाही. फक्त नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी विदर्भाचा उपयोग केला जात आहे. जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही, तोपर्यंत विदर्भाचा विकास शक्य नाही, अशी माहिती विदर्भ राज्य आघाडीचे प्रमुख माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी१० मार्च  शनिवारी गोंदिया येथील विश्राम गृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली. तसेच येत्या १९ मार्च रोजी वेगळ्या विदर्भासाठी रक्ताने लिहिलेले पत्र आंदोलन करून पंतप्रधानांना देणार असल्याचीही माहिती दिली.
वेगळ्या विदर्भाची मागणी ही खूप जुनी आहे. मात्र, सत्तारूढ भाजप व काँग्रेसही वेगळ्या विदर्भाच्या बाजूने नाही. एकंदरीत विदर्भातील जनतेला खोटे आश्वासन देऊन त्यांचा उपयोग करीत आहेत. त्यामुळेच विदर्भात विपुल वनसंपदा असूनही विदर्भात बेरोजगारी, आदिवासींचे कुपोषण, नक्षलवाद, शेतकरी आत्महत्या आदी प्रश्न कायम आहेत. जोपर्यंत शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत, तोपर्यंत विकास अशक्य आहे व हे करण्यासाठी वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नसल्याचेही अणे यांनी सांगितले. शांततापूर्ण व आंदोलनाच्या माध्यमातून वेगळा विदर्भ मिळणार नसल्याने विदर्भ राज्य आघाडी या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून गोंदिया, भंडाराची लोकसभेची पोटनिवडणूक तसेच २०१९ च्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लढून विदर्भातील जनतेकडून दाद मागणार असल्याचे सांगितले. तसेच येत्या १९ मार्च रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय नवराज्य संघाच्या वतीने आयोजित आंदोलनात विदर्भ राज्य आघाडी सहभागी होणार असून, रक्ताने लिहिलेले सुमारे १० हजार पत्र पंतप्रधानांना देऊन त्वरित वेगळा विदर्भ करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करणार असल्याचे आयोजित पत्रपरिषदेत अणे यांनी सांगितले.
यावेळी गोंदियाचे जिल्हाध्यक्ष छैलबिहारी अग्रवाल, संतोष पांडे, निरज खांदेवाले, सुरेंद्र पारधी, शैलेंद्र हारोडे, सनी तेलंग, महेंद्र निंबार्ते आदी उपस्थित होते