देवरीतील दिव्यांगांच्या राज्य क्रीडा स्पर्धा यशस्वी करा- पालकमंत्री बडोले

0
10
२३ ते २५ मार्च दरम्यान स्पर्धांचे आयोजन
गोंदिया,दि.११ : दिव्यांग व्यक्तीच्या अंगी असलेल्या सुप्त क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी राज्यात १९९७ पासून दिव्यांगासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. देवरीसारख्या दुर्गम, आदिवासी बहुल व मागास भागात पहिल्यांदाच दिव्यांगाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा येत्या २३ ते २५ मार्च दरम्यान आयोजित करण्यात येत असून ह्या स्पर्धा यशस्वी करा. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
काल १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात देवरी येथील क्रीडा संकुलात समाज कल्याण व विशेष साहाय्य विभाग यांच्या संयुक्त वतीने २३ ते २५ मार्च दरम्यान आयोजित दिव्यांगाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेताना श्री.बडोले बोलत होते. यावेळी अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.बडोले म्हणाले, दिव्यांगांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना तीन टक्के निधी देण्यात येत असून त्यांची रिक्त पदे भरण्याचे काम करण्यात येत आहे. त्यांना दिव्यंगत्वाचे ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात येत आहे. देवरी येथे होणाèया राज्यस्तरीय दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातून ३ हजार ५०० विद्यार्थी व ५०० कला आणि विशेष शिक्षक येत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्यांना रेल्वे स्टेशन व बसस्थानकावरून क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी बसेसची व्यवस्था करावी. तसेच आरोग्य विभागाने क्रीडा स्पर्धेच्या
ठिकाणी १०८ क्रमांक अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करावी. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना ह्या स्पर्धा बघण्यासाठी आणावे, असे त्यांनी सांगितले. श्री.पाटील म्हणाले, दिव्यांग खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचविण्याचे, त्यांच्या निवास व भोजनाच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मुलामुलींसाठी मूकबधिर, मतिमंद,अस्थिव्यंग आणि अंध प्रवर्गात ह्या क्रीडा स्पर्धा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.गायकवाड म्हणाले, क्रीडा स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी मोबाईल शौचालय, ई रिक्षाची सुविधा तसेच खेळताना खेळाडूला दुखापत झाल्यास औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी. क्रीडा स्पर्धेदरम्यान बसस्थानक गोंदिया व देवरी नियंत्रण कक्ष सुरू करावा. खेळाडूंसाठी काळजीवाहकाची व्यवस्था करावी. या दरम्यान वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी. असे त्यांनी सांगितले.
सभेला क्रीडा स्पर्धेशी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मिqलद रामटेके यांनी मानले.