राज्यसभेची निवडणूक बिनविरोध?

0
15

मुंबई,दि.12 – राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. भाजपतर्फे नारायण राणेंबरोबरच केरळचे व्ही. मुरलीधरन यांना; तर कॉंग्रेसने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.राज्यसभेतील 58 जागा रिक्‍त होणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. राज्यातील विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता, सहा जागांपैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येत आहेत. भाजपचे तिन्ही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि केरळमधील व्ही. मुरलीधरन यांचा समावेश आहे. जावडेकर यांनी याआधीच उमेदवारी अर्ज दाखल केला असून, राणे आणि मुरलीधरन यांनी आज अर्ज दाखल केला.

राज्यसभेसाठी गुप्त मतदान होत नाही. हात उंचावून मतदान करण्याची पद्धत आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रत्येकी दोन जागा रिक्‍त होत असताना त्यांनी प्रत्येकी एकच उमेदवार देण्याचे निश्‍चित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यसभेच्या सहाही जागा बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले. उद्या याबाबत अधिकृत घोषणा होईल.

महाराष्ट्रातील उमेदवार
भाजप – प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही. मुरलीधरन
शिवसेना – अनिल देसाई
राष्ट्रवादी कॉंग्रेस – वंदना चव्हाण
कॉंग्रेस – कुमार केतकर