शेतकरी मोर्चातून नक्षलवाद डोकावतोय – पूनम महाजन

0
9

मुंबई,दि.12(वृत्तसंस्था)- महाराष्ट्र किसान सभेच्या झेंड्याखाली नाशिकहून दरमजल करत रविवारी मुंबईतील सायन येथे पोचलेला शेतकऱ्यांच्या ‘लाँग मार्च’च्या माध्यमातून शहरी माओवाद डोकावतोय असं वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या खासदार पुनम महाजन यांनी केले आहे.शेतकऱ्यांच्या या लाँगमार्चचे आज महाराष्ट्राच्या विधानसभेतही पडसाद उमटले. सर्व विरोधकांनी मोर्चा संयमाने येत असल्याचे कौतूक केले. पण दुसरीकडे भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी मोर्चेक-यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शेतक-यांच्या महामोर्चातून शहरी माओवाद डोकावतोय असं महाजन म्हणाल्या आहेत.
मुंबईपर्यंत शांततेत आलेल्या या मोर्चाबद्दल एका मराठी वृत्त वाहिनीने भाजपा खासदार पूनम महाजन यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात असलेल्या लाल झेंड्याबद्दल आक्षेप घेतला. या आंदोलनातून शहरी माओवाद डोकावताना दिसत आहे. यामध्ये लाल झेंडे घेऊन शेतकरी निघाले आहेत.’ असं पूनम महाजन म्हणाल्या.
खासदार महाजन यांच्या या वक्तव्याने आंदोलनाला नक्षली रंग देण्याचा प्रयत्न झाल्याची टीका होत आहे. पूनम महाजन यांनी शेतक-यांचा अपमान केला आहे, त्यांनी शेतक-यांची माफी मागावी अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला आहे. ‘पायात काटा रुतल्यावर वाहणारं रक्त लाल असतं म्हणून ते माओवादी नसतं. शेतकऱ्याच्या कष्टाच्या घामालाही कुठल्याच राजकारणाचा वास नसतो. हा मोर्चा कष्टकऱ्यांचा आहे. न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शहरी माओवादी म्हणणाऱ्यांचा निषेध’ असे ट्विट त्यांनी केले.