सरकारने लोकशाही संस्थांचे खच्चीकरण चालविले-निखिल वागळे

0
20

नागपूर : नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी राष्ट्रनिर्माण आणि विकासाच्या मुद्यावरच लोकसभेची निवडणूक लढविली होती आणि जनतेनेही त्यांनी सत्ता सोपविली. मात्र गेल्या चार वर्षात दिलेले एकही आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. या प्रश्नांना नियोजितपणे बाजूला ठेवून धार्मिक ध्रुवीकरणाद्वारे हिंदू राष्ट्र निर्मितीचा आणि भारताचे हिंदू पाकिस्तान करण्याचा उघड कट रचला गेला आहे. यासाठी सत्तेच्या दबावातून प्रसार माध्यमे आणि न्यायव्यवस्थेतही ढवळाढवळ केली जात आहे. लोकशाही मार्गाने सत्तेत येऊनही संविधानाची चौकट मोडून लोकशाही संस्थांचे खच्चीकरण करण्याची प्रक्रिया आरएसएसच्या प्रभावाखाली असलेल्या सरकारने चालविली असल्याची घणाघाती टीका पत्रकार निखिल वागळे यांनी सोमवारी येथे केली.
बाळासाहेब सरोदे अमृत महोत्सव समितीच्यावतीने सर्वोदय आश्रम येथे सोमवारी ‘राष्ट्रनिर्माण आणि धर्मउत्थानात लोकशाहीचा गळा दाबला जातोय का?’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर बाळासाहेब सरोदे, मंगला सरोदे, अ‍ॅड. असीम सरोदे प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना ते म्हणाले की,  देशाच्या संविधानातील मूळ प्रास्ताविकेत ‘धर्मनिरपेक्ष’शब्द नंतर जोडण्यात आला यावर बरीच चर्चा घडते मात्र ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘धर्माधिष्ठित’ या दोन शब्दात फरक आहे हे आजच्या सत्ताधार्‍यांनी लक्षात घेतले पाहिजे. मूळात भारताचे संविधान हे ‘समरतावादी’नसून ‘समानतावादी’ असल्याचे विधान केले.ज्या लोकशाहीत एखाद्या घटकाला असुरक्षित वाटत असेल तर त्याला लोकशाही नाही म्हणता येत. मुळात गोळवलकर गुरुजी आणि गांधी-आंबेडकर विचारधारा या दोन टोकाच्या विचारधारा असून आजच्या सत्ताधार्‍यांना त्यांनी नेमक्या कोणत्या विचारधारेचा स्वीकार केला आहे याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे. आजचे सत्ताधारी ‘नवा भारत’ निर्माण करायचा आहे असे सांगून सत्तेवर आलेत याचा अर्थ आजपर्यंतचा भारत तुम्हाला मान्य नव्हता का?असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नव्या भारताची विचारसरणी, पायवा, चौकट ही संविधानातून येणारी असेल का, पेशवाई किंवा शिवशाही आणणारी असेल का, त्या नव्या भारतात प्रत्येक धर्म, वर्ग, जाती,पंथाचे स्थान काय राहील याबाबत पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये सांगावे असेही ते म्हणाले. आपल्या अडीच तासांच्या भाषणात वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री पंकजा मुंडे आदींवर अत्यंत विखारी टीका केली.
शेतकर्‍यांना ‘माओवादी’ म्हणण्यापर्यंत मंत्र्यांची मजल होते याचा अर्थ त्यांच्या राष्ट्रनिर्माणामध्ये अन्नदात्याला काही स्थान आहे का? मागील २0 वर्षात ३ लाख शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. अद्याप स्वामीनाथन आयोग लागू झाला नाही. याप्रसंगी वागळे यांनी अखलाख, रोहीत वेमूला, मोहसिन यांच्या उल्लेख करताना या राष्ट्राला ‘हिंदू पाकिस्तान’करण्याचा कट रचल्या जात असल्याचा आरोप भाषणात केला. सध्या देशात ‘अधिकृत’नव्हे तर ‘अघोषित’ आणिबाणी असल्याचेही ते म्हणाले.  सभागृह शांत होताच ‘लाल झेंडा क्रांतीचे प्रतीक आणि कामगारांचा ध्वज आहे. ही साधी अक्कल नाही, ते राष्ट्रनिर्माण काय करणार’, असा टोला त्यांनी लगावला.सरकारची वर्तमान कार्यपद्धती पाहता संविधान आणि लोकशाही संपुष्टात आणली जाईल आणि सार्वजनिक निवडणुका घेणेही बंद केले जाण्याची शक्यता आहे. पुढील काही चार ते पाच सार्वत्रिक निवडणुका शेवटच्या ठरतील, असा धोका त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बाळासाहेब सरोदे म्हणाले की, गांधीशिवाय तराणोपाय नाही या धारणेवरच जीवनप्रवास सुरू आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड म्हणजे सर्वोदय होय. अध्यात्म म्हणजे पोथी वाचून पोपटपंची करणे नव्हे तर ती जीवन जगण्याची कला आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यापुढेही वानप्रस्थाश्रम नाही तर जनप्रस्थाश्रमात राहूनच कार्यरत राहणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक अ‍ॅड. असीम सरोदे यांनी तर संचालन डॉ. रवींद्र भुसारी यांनी केले. संदेश सिंगलकर यांनी आभार मानले.