मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ‘आयसीयू’मधील रूग्णावर मांत्रिकाकडून उपचार, महिलेचा मृत्यू

0
16

पुणे(विशेष प्रतिनिधी),दि.13- पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिलेवर उपचार करण्यासाठी चक्क डॉक्टरकडूनच मंत्रतंत्राचा वापर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेत एका 24 वर्षीय विवाहितेला प्राण गमवावे लागले आहेत.  अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या घटनेनंतर संताप व्यक्त करताना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.संध्या सोनवणे (वय 24, दत्तवाडी) असे या महिलेचे नाव आहे तर, मांत्रिकाला बोलवून त्यांच्याकडून उपचार करून घेणा-या डॉक्टरचे नाव डॉ. सतीश चव्हाण असे आहे.

याबाबतची माहिती अशी की, संध्या सोनवणे यांच्या छातीत दुधाची गाठ झाल्याने स्वारगेटजवळ दवाखाना असलेल्या डॉ. सतीश चव्हाण यांच्याकडे त्या उपचारासाठी गेल्या. मात्र, या डॉक्टरने संध्या यांच्यावर चुकीची शस्त्रक्रिया केली. यामुळे संध्या या प्रकृती खालावू लागली. गडबड झाल्याचे लक्षात येताच डॉ. चव्हाण याने संध्या यांना मंगेशकर रूग्णालयात हलविण्यास सांगितले. सोबतच तो संध्या यांच्या कुटुंबियांसोबत तेथेही होता. यानंतर संध्या यांच्यावर उपचार करण्यासाठी एका मांत्रिकला बोलविण्यात आले. संबंधित मांत्रिकाने संध्या यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू असताना तंत्र-मंत्र हा अघोरी उपाय केला. यावेळी संध्या यांचे कुटुंबिय व डॉ. चव्हाण हा सुद्धा उपस्थित होता.

दरम्यान, संध्या सोनवणे यांचा मृत्यू सोमवारी पहाटे झाला. शस्त्रक्रिया चुकीची केल्याने रक्तस्त्राव झाल्याने संध्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर हा अघोरी प्रकार शिवसेनेचे पदाधिकारी सचिन तावरे यांना कळला. त्यांनी या संदर्भात तक्रार केल्यानंतर ही घटना समोर आली.

मात्र, हा मांत्रिक नेमका कुणी बोलावला याची माहिती पुढे आली नाही. मात्र, हा मांत्रिक डॉ. चव्हाण यानेच बोलविल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान,दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने मात्र असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत.