मुख्य बातम्या:

पवनी बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा

पवनी,दि.१४ :-येथील आठवडी बाजारात भाजी विक्रेते व किरकोळ वस्तू विक्रेते यांना जागा होत नाही. रस्त्याच्या कडेला बसले तर वाहतूक खोळंबलेली असते. रस्त्याच्या कडेला कोणत्याही परिस्थितीत भाजी विक्रेते बसणार नाही, असा मुख्याधिकारी यांचा अलिखित आदेश आहे. व्यवसाय बुडत असल्याने बाजारात नियमित बसणारे भाजी व किरकोळ वस्तू विक्रेते एकत्र आले आणि नगर परिषदकडे मोर्चा वळविला. एक ते दीड तास वाट पाहून मुख्याधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी आल्या नाहीत. त्यामुळे निराश होऊन व्यापारी परतले व १४ मार्चपासून बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
या मोर्चाचे नेतृत्व बसपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नंदूरकर यांनी केले. यावेळी राजू गणवीर, प्रफुल्ल सावरकर, क्रिष्णा खांदाडे, भूषण सावरकर, धनराज उपरीकर, सुमन नंदूरकर, छबू डोंगरे, विठा बावनकर, हरीहर खापरीकर व शेकडो भाजीपाला विक्रेते व किरकोळ वस्तू विक्रेते उपस्थित होते. नगर परिषद पदाधिकारी व नगरसेवक यांनी व्यावसायिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी नगर परिषद कार्यालयाकडे येण्याचे सौजन्य देखील दाखविले नाही. त्यामुळे नगरपरिषद मुदार्बादच्या घोषणा देत व्यावसायिकांनी बाजारात मोर्चा वळविला. बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सर्वसामान्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

Share