शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांसाठी निवृत्तीयोजना लागू-विनोद तावडे

0
11

मुंबई ,दि.14ः- १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर  मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माधमिक व अध्यापक विद्यालयातील १०० टक्के अनुदानित पदावरील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांसाठी निवृत्तीयोजना लागू केली असून, या योजनेंतर्गत सुमारे ५९ हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना १२५८.३३ कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे. याबाबतच शासन निर्णय २८ फेब्रुवारी २०१८ रोजी काढण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषेदमध्ये नियम ९७ अन्वये विक्रम काळे, श्रीकांत देशपांडे आदी सदस्यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना विनोद तावडे यांनी सांगितले की, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना जुनी निवृत्ती योजना लागू करण्याबाबत सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन यांसदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या प्रश्नांविषयी सरकार सकारात्मक आहे.

 १ नोव्हेंबर २००५ पूर्वी ज्या शैक्षणिक संस्था विनाअनुदानित किंवा अंशत: अनुदानित होत्या त्या संस्था ज्या दिनांकास १०० टक्के अनुदानावर येतील, त्या दिनांकास लागू असलेली निवृत्ती वेतन योजना शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचा-यांना लागू आहे. म्हणजेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी संस्था १०० टक्के अनुदानावर आली असेल तर जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना व १ नोव्हेंबर २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आल्यास त्यांना नवीन परिभाषित अंशदायी सेवानिवृत्ती योजना लागू असल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले.

याबरोबरच बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील तसेज मौजे इरला येथील आदर्श क्रीडा, सांस्कृतिक, जनजागृती ग्रामविकास बहुउद्देशिय मंडळ येथील व्यायामशाळेच्या बांधकामा संदर्भात तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व व्यायामशाळांच्या बांधकामाची चौकशी करण्यात येईल, असे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. विधानसभेत डॉ.शशिकांत खेडेकर, राहुल बोंद्रे आदि सदस्यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील तुळजाभवानी शिक्षण प्रसारक मंडळ, वनसडी , वीर सावरकर भोयगाव, श्रीराम शिक्षण संस्था पिपर्डा या संस्थेच्या व्यायामशाळेच्या बांधकाम अनुदानात झालेल्या गैरव्यवहारा संदर्भात संबंधित संस्थाविरुध्द एफआयआर दाखल करण्यात येईल व संबंधित दोषी अधिका-यांविरुध्द कारवाई करण्यात येईल, असेही विनोद तावडे यांनी सांगितले.