समाज माध्यमांचा सकारात्मक वापर काळाची गरज – प्र. जिल्हाधिकारी दिलीप तलमले

0
51

भंडारा  दि.१४: समाज माध्यम (सोशल मीडिया) संपर्काचे प्रभावी माध्यम आहे. लोकांना आपली मत मतांतरे व्यक्त करण्याचा हा महत्त्वाचा प्लॅटफॉर्म असून तरुण पिढी समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. मात्र अनेकवेळा समाज माध्यमांचा चुकीच्या पोस्ट शेअर करण्यासाठी वापर होताना दिसतो. अशा परिस्थितीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सोशल मीडिया महामित्र हा उपक्रम राबवून जागृतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. समाज माध्यमांचा वापर सकारात्मकरित्या करणे काळाची गरज असून समाज माध्यमाच्या सकारात्मक वापरातूनच विवेकी समाज निर्माण होईल, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर सोशल मीडिया महामित्र उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सोशल मीडिया संवाद सत्राचे आयोजन स्टार रोजगार व स्वयंरोजगार संस्था भंडारा येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे, अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस. खांडेकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, कोषागार अधिकारी अमीत मेश्राम, एनआयसीचे डीआयओ संदीप लोखंडे व सतीश ठाकरे यावेळी उपस्थित होते.
सोशल मीडियाचा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी व त्याच्या योग्य उपयोगासाठी शासनाने हा उपक्रम राबविला आहे. याद्वारे शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यास मदत होणार आहे. या संवाद सत्रातील विजेत्यांचा मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद होणार आहे. या प्लॅटफॉर्मचा योग्य उपयोग करा व जनतेत जागृती करुन विवेकशिल समाज घडवा, अशा शुभेच्छा प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी उपस्थिताना दिल्या.
सोशल मीडिया माहितीच्या आदानप्रदानाचे महत्त्वाचे माध्यम असून तरुण पिढीने सोशल मीडिया काळजीपूर्वक वापरण्याची आवश्यकता आहे. आपल्या हातून चुकीचा संदेश जाणार नाही. ही काळजी घेतल्यास सोशल मीडिया समाजोपयोगी माध्यम ठरेल. सोशल मीडिया महामित्र हा उपक्रम सकारात्मक संदेश देणारा असून सोशल मीडियाविषयी जागृती निर्माण करणारा आहे, अशा शुभेच्छा निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिल्या.
या सत्राच्या यशस्वीतेकरीता जे.एम. पटेल महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख सुमंत देशपांडे, सामाजिक कार्यकर्ता नितीन कारेमोरे, अक्षय वानखेडे, परिविक्षाधिन तहसीलदार सिध्दार्थकुमार मोरे व रोहित भोंगाडे यांनी निरीक्षक व परिक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी केले तर आभार सतीश ठाकरे यांनी मानले. या संवाद सत्राला चांगला प्रतिसाद प्राप्त झाला.