बिल्डरकडून 2 कोटींची खंडणी घेताना पुण्यातील शिवसेनेचा ZP सदस्य अटकेत

0
13

मुंबई,दि.१५:- मुंबईतील पवई भागातील एका नामांकित बिल्डरला 20 कोटींची खंडणी मागणा-या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यला 2 कोटींची खंडणी घेताना बुधवारी पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आज त्यांना कोर्टात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुलाब विठ्ठल पारखे (ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या जिल्हा परिषद सदस्याचे नाव नाव आहे. पारखे शिवसेनेच्या तिकीटावर जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. पवई पोलिसांनी भादवि कलम 384 (खंडणी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी की, पवईत कार्यालय असणा-या एका नामांकित बिल्डरला पारखे यांनी 20 कोटींची रुपयांची खंडणी मागितली. त्याआधी या बिल्डरबाबत माहिती अधिकारातून काही माहिती घेतली होती. यात काही घोळ असल्याचे पारखे यांना माहित होते. त्यामुळे माहिती सार्वजनिक न करण्यासाठी पारखे यांनी बिल्डरकडे खंडणी मागितली. मात्र हे प्रकरण दाबण्यासाठी संबंधित बिल्डरने पारखेला 10 लाख रूपये दिले. मात्र, यावर त्यांचे समाधान झाले नाही.पारखे व त्याची माणसे बिल्डरला पैशांसाठी आणखी धमकावू लागली. आम्हाला पैसे नाही दिले तर माध्यमांकडे जाऊ व तुमची पोलखोल करू, अशी धमकी दिली. यानंतर बिल्डरच्या कार्यालयातून पवई पोलिस ठाण्यात धाव घेतली व याबाबतची माहिती दिली. सोबतच पुरावा म्हणून फोन कॉल रिकॉर्ड सादर केले.