युवकांच्या श्रमदानातून पवन तलावाचा कायापालट

0
13

गोरेगाव दि.१६ः येथील काही युवकांनी एकत्र येवून दुर्लक्षित असलेल्या पवन तलावाचा विकास करण्याचा संकल्प करुन तो तडीस नेला. तब्बल ४५ रविवार पवन तलावाच्या ठिकाणी युवकांनी श्रमदान करुन या तलावाचा कायापालट केला. येथील आशीष बारेवार यांनी या तलाव परिसराचा पर्यटन केंद्राच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कार्याला गावातील इतर युवकांनी साथ दिली. गोरेगावच्या पवन तलावाच्या सौंदर्यीकरणाचा विषय डोक्यात आला. रविवारी एका तासभराच्या श्रमदानातून पवन तलावाच्या सौंदर्यीकरणात भर पडत असेल तर लाख मोलाचे आहे, असेच मला वाटले. त्यानंतर आपल्या सहकाºयांना घेवून दर रविवारी या तलावाच्या परिसरात श्रमदान करण्यास सुरूवात केल्याची भावना गोरेगाव नगरपंचायतीचे उपाध्यक्ष इंजि.आशिष बारेवार यांनी व्यक्त केली.आपण जेथे जन्मलो, वाढलो, शिकलो व जेथे आपला विकास झाला, त्या गावाच्या विकासासाठी योगदान देणे हे आपले मुख्य कर्तव्य आहे. याच भावनेतून समाजाच्या व सामान्य माणसाच्या विकासासाठी आपण कार्याला सुरूवात केल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळेच गोरेगाव येथील पवन तलाव अल्पावधीतच नावारुपास आले. या तलाव परिसराला भेट दिल्यानंतर आणि तेथील नैसर्गिक सौंदर्य पाहून प्रत्येकाच्या मुखात केवळ एकच वाक्य असते. ते म्हणजे युवकाच्या श्रमदानातून पवन तलावाचे नंदनवन झाले. युवकांनी परिसराचा विकास केला. शिवाय टाकाऊ वस्तुंचा उपयोग करून परिसराच्या सौंदर्यात आणखी भर घातली. तलावाच्या परिसरात कुटी तयार केल्या. टाकाऊ टायरला रंगरगोटी करुन त्याचा उपयोग वृक्षांसाठी कठडे म्हणून केला. तर टाकाऊ रंगाच्या डब्यांचा उपयोग पक्ष्यांसाठी घरटे तयार करण्यासाठी केला. पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली असून झाडांना पाण्याचे पात्र लावले.

पवन तलावासाठी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाच्या उपक्रमाला युवकांनी उदंड प्रतिसाद दिला. यासाठी नमन जैन, विकास बारेवार, यश कुंडलवार, दीपक रहांगडाले, अमोल भेंडारकर, संजय घासले, हिमांशू बारेवार,आशिष रहांगडाले, नितीन शेंडे, रवी ठाकूर, राहुल ठाकरे, पुरूषोत्तम साकुरे, अश्विन रूखमोडे, प्रणय वैद्य, लकी ठाकरे, प्रतिक फाये, सुधीर गौंधर्य, प्रवीण बारेवार, पंकज बारेवार, अशोक गिºहेपुंजे यांनी सहभाग घेतला. त्यांच्या गाळलेल्या घामाचे फलीत आता येथे येणाºयांच्या आनंदातून व्यक्त होत असल्याचे बारेवार यांनी सांगितले.