टँकरची दुचाकीला धडक; मुख्याध्यापकाचा मृत्यू

0
11

भंडारा,दि.१६ः-शाळा सिद्धी कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी येत असताना कारधा टि-पॉईंटजवळ भरधाव टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत मोहरणा (ता. लाखांदूर) येथील मुख्याध्यापक रवींद्र शामराव ढोके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मांढळ येथील मुख्याध्यापक टिकाराम ठाकरे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर भंडारा येथे होणारी कार्यशाळा रद्द करण्यात आली.
भंडारा येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात मुख्याध्यापकांचे शाळा सिद्धीचे प्रशिक्षण सकाळी १0.३0 ते ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी मोहरणा येथील गोविंदप्रभू विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र ढोके व त्याच संस्थेंतर्गत बेलाटी येथील मुख्याध्यापक टिकाराम ठाकरे दुचाकी क्र. एम. एच. ३६/ एसी-४६0७ ने भंडाराकडे येत होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील कारधा टि-पाईंट येथे रायपूरकडून भरधाव येणार्‍या टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवर मागे बसलेले रवींद्र ढोके यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक टिकाराम ठाकरे जखमी झाले. अपघातानंतर टॅंकरचा चालक पसार झाला. कारधा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लांडे करीत आहेत.