देसाईगंज न. प. क्षेत्रातील बांधकाम परवानगी आता आॅनलाईन पध्दतीने

0
17

देसाईगंज,दि.16 – स्थानिक नगर परिषदेच्यावतीने शासनाच्या निर्देशानुसार आॅनलाईन पध्दतीने बांधकाम देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून तोषकुमार गोविंदा धोटे यांच्या संगणीकृत प्रणालीव्दारे तयार झालेले बांधकाम परवानगी प्रमाणपत्र नगर परिषदेचे नोंदणीकृत खाजगी अभियंते के. एस. कातुरे यांना नगराध्यक्षा शालूताई दंडवते यांच्या हस्ते प्रदान करून सुरूवात करण्यात आली.

याप्रसंगी न. प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, नगरसेवक मनोज खोब्रागडे, अशोक कांबळे, बांधकाम अभियंता अनिल दाते, अभियंता प्रफुल दुफारे उपस्थित होते.
या प्रणालीमुळे नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना वारंवार नगर परिषदेच्या हेलपाट्या माराव्या लागणार नाही. या प्रणालीमुळे यापुढे अर्ज व बांधकाम परवानगी संबंधी सर्व दस्तावेज न. प. च्या नोंदणीकृत खाजगी अभियंता यांच्या मार्फतीने सादर करून विहित मुदतीत बांधकाम प्रमाणपत्र मिळणार असल्याचे मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांनी सांगितले. तसेच या संगणक प्रणालीमार्फत नवीन खाजगी अभियंत्यांची नोंदणी करणे तसेच ज्योते प्रमाणपत्र, अंशता भोगवटा प्रमाणपत्र, पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र आदी सेवा पुरविता येणार आहेत.या प्रणालीमुळे वेळेचा व श्रमाचा अपव्यय न होता विहित मुदतीत बांधकाम प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र प्राप्त होऊ लागल्याने शहरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.