अकोला जिल्ह्यात हार्दिक पटेलचा एल्गार मेळावा

0
6

अकोला , दि. १६ :-  विदर्भातील शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि २४ रोजी एल्गार मेळावा आयोजित केला अाहे.शेतकरी व बेरोजगार युवकांच्या या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ युथ फोरमतर्फे पाटीदार युवा नेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीत एल्गार मेळावा आयोजित केला आहे. अकोल्यातील स्वराज्य भवनात संध्याकाळी 6 वाजता आयोजित या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे राहणार असल्याची माहिती विदर्भ युथ फोरमचे अध्यक्ष मंगेश भारसाकळे यांनी दिली.

विदर्भ युथ फोरमने आयोजित केलेल्या या मेळाव्याच्या माध्यमातून हार्दिक पटेल केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर काय तोफ डागतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वर्षी 1 कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिले होते. मात्र, गेल्या 4 वर्षात 1 टक्का युवकांनाही रोजगार मिळाला नाही. त्यामुळे सुशिक्षीत बेरोजगार युवकांमध्ये तीव्र असंतोष आहे. नवीन नोकर भरतीवर सरकारने बंदी आणून बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. राज्यात अडीच लाख प्रशासकीय पदे रिक्त असतांनाही सरकार ही पदे भरण्यास टाळाटाळ करीत आहे. निवडणुक प्रचारात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट नफा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दिडपट नफा तर सोडाच योग्य हमीभावही मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिला नसल्याने शेतकरी मोदी सरकारवर प्रचंड नाराज आहेत,’ अशी विदर्भ युथ फोरमची भूमिका आहे.