पराभवाच्या भीतीने राज्यात पोटनिवडणुकांना उशीर

0
6

गोंदिया,दि.16 ः-लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा सातत्याने पराभव होत असल्यामुळे राज्यातील भंडारा-गोंदिया आणि पालघर या दोन लोकसभा क्षेत्राच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात विलंब करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या रिक्त जागेवर निवडणूक घेण्यासंदर्भात पटोले यांनी शुक्रवारला दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन दिले आहे. आपण खासदारपदाचा राजीनामा ७ डिसेंबरला दिला. त्यानंतर पालघरचे भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाले. तेव्हापासून या दोन्ही ठिकाणी खासदारपद रिक्त आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या लोकसभा सदस्यपदाचा राजीनामा व माझा राजीनामा १५ डिसेंबरला या एकाच दिवशी लोकसभा अध्यक्षांनी मंजूर केला.
उत्तरप्रदेशातील गोरखपूर व फुलपूर या दोन्ही मतदारसंघांची निवडणूक ११ मार्चला झाली. परंतु आपण राजीनामा देऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही पोटनिवडणूक घेण्यात आली नाही. उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच भाजपचा पराभव झाला. पोटनिवडणुकासंदर्भात राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची असते. लोकांमध्ये भाजपबद्दल नाराजी असल्यामुळे राज्यातही भाजपचा पराभव होऊ शकेल, या भीतीने मुख्यमंत्री पोटनिवडणुकीसाठी विलंब करीत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी निवडणूक लढवणार का? यावर ते म्हणाले, निवडणुका तर जाहीर होऊ द्या? निवडणूक कोण लढणार याची चिंता भाजपने करू नये, असा पलटवारही पटोले यांनी केला.यावेळी त्यांच्यासोबत अमर वराडे सह इतर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.