नॅचरोपॅथी सेंटरच्या नावावर ‘सेक्स रॅकेट’

0
7

नागपूर,दि.16 : खरे टाऊन धरमपेठ येथे नॅचरोपॅथी सेंटरच्या नावावर सुरू असलेला ‘हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट’ पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी या अड्ड्यावर धाड टाकून अड्ड्याच्या सूत्रधारासह तीन आरोपीला अटक केली. तर त्यांच्या जाळ्यातून आठ मुलींना मुक्त करण्यात आले.
रजत सुभाष ठाकूर (२३) रा. वैशालीनगर हिंगणा रोड, स्वप्नील विजय गुप्ता (२२) रा. बालाजीनगर हिंगणा रोड आणि शरद पुरुषोत्तम नंदेश्वर (२८) वैशालीनगर पाचपावली अशी आरोपीची नावे आहे. रजत व स्वप्नील हे या अड्ड्याचे मुख्य सूत्रधार आहे. दोघेही खरे टाऊन येथील सरस्वती अपार्टंमेंट आणि अवंती अपार्टमेंटमध्ये नॅचरोपॅथी सेंटरच्या नावावर देह व्यापाराचा अड्डा चालवित होते. त्यांनी शरद नंदेश्वरला मॅनेजर म्हणून ठेवले होते.रजत व स्वप्नील अनेक दिवसांपासून देह व्यापारात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ग्राहकांची कमतरता नव्हती. फोनच्या माध्यमातून ग्राहक त्यांच्याशी संपर्क साधत होते. ग्राहकाच्या कुवतीनुसार मुलींची किमत वसुल केली जात होती. गेल्या वर्षभरापासून दोन्ही ठिकाणी देह व्यवसाय सुरू होता.
खरे टाऊन हा उच्चभ्रू लोकांचा परिसर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घर सुद्धा याच वस्तीत आहे. त्यामुळे संशयास्पद हालचाली चटकन लक्षात येतात. काही दिवसांपासून येथील नागरिकांना सरस्वती अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये असलेल्या नॅचरोपॅथी सेंटरमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याचा संशय आला. सामाजिक सुरक्षा पथकालाही याची चाहुल लागली. पथकाने या अड्ड्यावर गुरुवारी सायंकाळी डमी ग्राहक पाठवला. आरोपीनी एका तरुणीचा सौदा करताच पोलिसांनी धाड टाकली. तेव्हा रजत व स्वप्नील हा चार तरुणीसोबत सापडला. पोलिसांनी जेव्हा मुलींना विचारपूस केली तेव्हा त्यांनी अवंती अपार्टमेंटच्या दुसºया माळ्यावरील फ्लॅटमध्ये सुद्धा अड्डा सुरू असल्याचे सांगितले. पोलिसांनी लगेच तिथेही धाड टाकली. तेथून शरद हा चार मुलींसोबत होता.
आरोपी एका वर्षापासून दोन्ही अड्डे चालवित होते. पीडित तरुणींचे म्हणणे आहे की, त्यांना नॅचरोपॅथीच्या बहाण्याने कामावर ठेवण्यात आले होते. नंतर ग्राहकांना खूश करण्यासाठी अतिरिक्त पैसे देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यामुळे त्या देह व्यापार करण्यास तयार झाल्या.