विदर्भाने जिंकला ‘इराणी करंडक’

0
12

नागपूर दि.१९ : रणजी विजेत्या विदर्भाने अपेक्षेप्रमाणे पहिल्या डावातील 410 धावांच्या आघाडीच्या बळावर बलाढ्य शेष भारत संघाचा धुव्वा उडवून रणजी पाठोपाठ इराणी करंडकावर आपले नाव कोरले आणि वैदर्भी क्रिकेटप्रेमींना गुढीपाडव्याची अविस्मरणीय भेट दिली.

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर रविवारी अनिर्णित संपलेल्या पाच दिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान विदर्भाने पहिला डाव विक्रमी 7 बाद 800 धावांवर घोषित केल्यानंतर, या धावसंख्येचा पाठलाग करताना शेष भारताचा डाव 390 धावांत आटोपला. निर्जीव खेळपट्टीवर रजनीश गुरबानीने सर्वाधिक चार आणि फिरकीपटू आदित्य सरवटेने तीन गडी बाद करून विजयात मोलाचा उचलला. याशिवाय उमेश यादवने दोन बळी टिपले. तर अनुभवी फलंदाज वसीम जाफर (286), गणेश सतीश (120) आणि अपूर्व वानखेडे (नाबाद 157) यांचेही विजयात उल्लेखनीय योगदान राहिले. शेष भारताच्या हनुमा विहारीने (183) इराणी पदार्पणातच शतक आणि जयंत यादवने चिवट 96 धावा काढून संघाला सन्मानजनक धावसंख्येवर पोहोचविले. कर्णधार फैज फझलच्या नेतृत्वात विदर्भाने गेल्या जानेवारीत प्रथमच रणजी करंडक जिंकला होता.

संक्षिप्त धावफलक – विदर्भ पहिला डाव : 7 बाद 800 डाव घोषित (वसीम जाफर 286, अपूर्व वानखेडे 157, गणेश सतीश 120, सिद्धार्थ कौल 2/91). दुसरा डाव : बिनबाद 79 धावा (अक्षय वाडकर नाबाद ५०, आर. संजय नाबाद 27) शेष भारत : पहिला डाव : सर्वबाद : 390 धावा (हनुमा विहारी 183, जयंत यादव 96, पृथ्वी शॉ 51, रजनीश गुरबानी 4/70, आदित्य सरवटे 3/97, उमेश यादव 2/72).