कॅन्सर रुग्णालय रुग्णांसाठी मैलाचा दगड ठरेल-फडणवीस

0
9

नागपूर,१९ :विविध प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, कर्करोगाचे त्वरित व अचूक निदान होणे गरजेचे आहे. हॉस्पीटल व रिसर्च सेंटरसाठी राज्य शासनातर्फे भरीव मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कॅन्सर रिलिफ सोसायटीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर कोहळे, सुनील केदार, डॉ. मिलिंद माने, कॅन्सर रिलिफ सोसायटीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार, उपाध्यक्ष बसंत लाल साव, सचिव अशोक कृपालिनी, रणधीर जव्हेरी, आवतराम चावला, सुरेश शर्मा, डॉ. मदन कापरे, संचालक डॉ. सुभ्रजीत दासगुप्ता, तसेच मनपा आयुक्त अश्‍विन मुदगल, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गरिबांबाबत संवेदना कायम जपल्या. याच शिकवणीच्या आधारावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर हॉस्पीटल व रिसर्च सेंटर ही संस्था मागील ४५ वर्षांपासून गरीब कर्करुग्णांची अविरत सेवा करित आहे. विविध प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, यासाठी कर्करोगाचे त्वरीत व अचूक निदान होणे गरजेचे असते. कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाकडूनही मोहीमही राबविण्यात येत आहे. नवीन इमारतीद्वारे कर्करुग्णांना सुविधा उपलब्ध होतील. रुग्णालयाची नवीन इमारत व सुविधांद्वारे कर्करुग्णांसाठी सेवा पुरविण्यात हे रुग्णालय निश्‍चितच मैलाचा दगड ठरेल. केंद्र व राज्य शासनामार्फत रुग्णालयाला भरीव मदत करण्यात येईल, अशी ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली. नितीन गडकरी म्हणाले, कॅन्सर रुग्णालय व रिसर्च सेंटर आता नवीन रूपात उभारण्यात येणार आहे. दिवसेंदिवस विविध प्रकारच्या कर्करुग्णांची संख्या वाढत आहे. नागपूर येथे विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेश व अन्य राज्यातूनही कर्करोगावरील उपचारांसाठी रुग्ण मोठय़ा संख्येने येतात. गरीब रुग्णांना माफक शुल्कात सेवासुविधा देण्यात याव्यात, अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली. राष्ट्रसंतांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री व ना. गडकरी यांनी नवीन व अत्याधुनिक इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करून कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी यावेळी कर्करोगाच्या निदान चाचणी संदर्भातील माहितीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थान मोझरी येथील जनार्धन बोथे, तसेच नागपूरसह विदभार्तून गुरुदेव सेवामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.