जिल्हा परिषदेत जागतिक महिला दिन उत्साहात

0
60

गोंदिया,दि.१९ : जागतिक दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, महिला व बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महिला बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, जि.प.सदस्य, पं.स.सभापती यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलीत करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी जागतिक महिला दिन कार्यक्रमाअंतर्गत महिलांच्या समस्या व त्यावर कायदेशीर प्रतिबंधक उपाय सांगितले. त्याचप्रमाणे अस्मिता तसेच किशोरवयीन मुलींचे अस्मिताबाबतचे कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जि.प.अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांकडून नाट्य, गायन व नृत्य सादर करण्यात आले. जिल्ह्यातील वरिष्ठ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांनी त्यांच्या आयुष्याचे अधिक वेळ अंगणवाडी केंद्रामार्फत महिला व मुलांना चांगल्याप्रकारची सेवा दिल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराव पारखे यांनी केले, संचालन जि.प.च्या विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.