एमबीए सीईटी परीक्षेत नांदेडची दिव्या बियाणी राज्यात पहिली

0
7

नांदेड, दि. 19 ः एमबीए सीईटी परीक्षेत नांदेडची दिव्या गोवर्धन बियाणी राज्यात पहिली आली आहे. पाच दिवसांपूर्वी झालेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यात दिव्याने 200 पैकी 165 गुण घेऊन राज्यात सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे.दिव्या ही पत्रकार गोवर्धन बियाणी तसेच अ‍ॅड. दीपा बियाणी यांची कन्या आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेदेखील तीने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला होता. 2014 साली अभियांत्रिकी आणि त्यापाठोपाठ विधी शाखेची पदवी मिळविल्यानंतर सध्या ती विधी शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची परीक्षा देत आहे. युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस होण्याचे ध्येय दिव्या हिने बाळगले असून सध्या ती युपीएससी परीक्षेचा सराव करीत आहे.

दिव्या हिला लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड होती. स्कॉलरशीप, नवोदय, राष्ट्रीय प्रज्ञा शोध सारख्या विविध परीक्षेत तिने यश प्राप्त केले आहे. उत्कृष्ट बुद्धीबळपटू म्हणून देखील तिला गौरविण्यात आले आहे.युपीएससी परीक्षेची पूर्व तयारी करताना अतिरिक्त अभ्यासक्रम देखील पूर्ण व्हावा या उद्देशाने दिव्याने अभियांत्रिकी व विधी शाखेची पदवी संपादन केली. व्यवस्थापन शाखेच्या अभ्यासक्रमासाठी मुंबईतील सुप्रसिद्ध जमनालाल बजाज व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात प्रवेश मिळविण्याचा तिचा संकल्प होता. त्या दृष्टीने ती कामाला लागली. जवळपास 20 मॉकटेस्ट दिल्या. जास्तीत जास्त सराव केला. लहानपणापासून स्पर्धा परीक्षेकडे वळल्यामुळे सीईटीच्या पूर्व तयारीसाठी मनावर जास्त ताण पडला नाही. केवळ सराव आणि लक्षपूर्वक अभ्यास, हेच या यशाचे गमक असल्याचे दिव्या बियाणीने सांगितले. राज्यात प्रथम आल्याचे कळाल्यानंतर खूप आनंद झाला. एमबीएला प्रवेश घेतल्यानंतरदेखील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज राहणार असल्याचे दिव्या हिने सांगितले.