एसटीच्या महिला वाहकावर चाकू हल्ला,आरोपीस अटक

0
9

अमरावती, दि. 20:राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकावर एका युवकाने बसमध्ये चाकूने हल्ला केल्याची घटना आज मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर एसटी कर्मचाऱयांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदविला.सविस्तर असे की,कविता गावंडे (धोटे) (३२) चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या वाहक महिलेचे नाव आहे. कविता या अमरावती आगारामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. आज दुपारी त्या एसटी बस (क्रमांक एम एच 40/एन 9300) वर कार्यरत होत्या. दुपारी त्या अमरावती-दापोरी बस घेऊन जात होत्या, बसमध्ये गर्दी होती. बसच्या दाराजवळ सावरकर नामक वृद्ध महिला बसली होती. महिलेला यावली येथे जायचे होते. नांदगाव पेठ नजीक वृद्ध महिला व वाहक यांच्यात वाद झाला. यामुळे वाहक जावीत गावंडे यांनी वृद्धेस रस्त्यावर उतरवून दिले. बस खाली उतरताच वृद्धेने मोबाईलद्वारे ही माहिती तिचा मुलगा कमलेशला दिली. आईला बस खाली उतरवून दिल्याचे समजताच कमलेश हा नांदगाव नंतरच्या माहुली येथील बस थांब्याजवळ बसची प्रतीक्षा करीत होता. सदर बस येताच त्याने काही प्रवाश्यांना खाली उतरू दिले. यानंतर तो बसमध्ये चढला आणि वाहक कविता गावंडे यांच्याशी वाद घातला. यावेळी संतापलेल्या कमलेशने त्याच्या जवळील चाकूनें महिला वाहकाच्या डोके, हातावर सपासप 5 वार केले. यात महिला वाहक जखमी झाली. यानंतर हल्लेखोर पसार झाला. बस चालक व प्रवाश्यांनी कविता गावंडे हिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. माहुली पोलिसांनी कमलेश सावरकर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.