महिलांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी महिला मेळावा-आ.पुराम

0
19

सालेकसा,दि.21 : विविध कार्यक्रमांतून महिलांना स्वत:च्या कलागुण व कर्तृत्वाला दाखविण्याची संधी मिळते. सोबतच शासनाच्या विविध योजना तसेच महिलांच्या सुरक्षा व विकासासाठी अस्तित्वात असलेले कायदे व नियमांची माहिती मिळते. करिता महिलांमध्ये एकप्रकारची ऊर्जा निर्माण करण्यासाठी महिला मेळावा आयोजीत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.
जिल्हा महिला व बालविकास विभागाच्यावतीने सोमवारी (दि.१९) आयोजीत जिल्हास्तरीय महिला मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने, पंचायत समिती सभापती अर्चना राऊत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष उषा मेंढे, जि.प. सदस्य जियालाल पंधरे, दुर्गा तिराले, देवराम वडगाये, विजय टेकाम, ललीता चौरागडे, ज्योती वालदे, उषा शहारे, पंचायत समिती उपसभापती दिलीप वाघमारे, सरपंच संगीता कुसराम, पं.स.सदस्य स्नेहा गौतम, इंद्र धावडे, ललीता बहेकार, गोंदियाच्या पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, खंडविकास अधिकारी ए.एस. खाडे, उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुनील अग्रवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय वानखेडे, डॉ. शोभना सिंह, डॉ. सुषमा देशमुख, संजय दोनोडे, राजू काळे उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मडावी यांनी, सावित्रीच्या पुण्याईनेच आम्हा महिलांना शिक्षणाची संधी मिळाली. तसेच माता जिजाऊने शिवबाला घडविले. तेव्हा प्रत्येक मातेने आपल्या मुलांवर योग्य संस्कार करुन घराघरात शिवबा घडवा, असे विचार व्यक्त केले. सभापती दोनोडे यांनी, हुंडा प्रथा, बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार, स्त्रीभृणहत्या अशा विविध कायद्यांची जाणीव करुन दिली.कार्यक्रमात महिला व मुलीसाठी विविध सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले. यासोबत महिलांसाठी रांगोळी, हस्तकला, पाककला व सृदृढ बालक स्पर्धा घेण्यात आल्या. यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.संचालन बालविकास प्रकल्पाच्या रंजना गौर यांनी केले.