वनविकासातील लोकसहभाग अमूल्य- मुख्यमंत्री

0
16

मुंबई दि. २१: विकास व्हावा पण तो कुठल्याही विनाशाशिवाय ही संकल्पना स्वीकारत महाराष्ट्राने शाश्वत विकासाची कामे मोठ्याप्रमाणात हाती घेतली असून महाराष्ट्राच्या वन विकासात लोकसहभाग अमूल्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय वन दिनाचे औचित्य साधत संत तुकाराम वनग्राम पुरस्कारांचे वितरण तसेच वनसेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, आमदार मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुमित मल्लिक,  वन विभागाचे सचिव विकास खारगे, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदेलसिंह चंदेल यांच्यासह पुरस्कार प्राप्त गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे सदस्य तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पुणे वनपरिक्षेत्रातील भोर येथील वनरक्षक कै. सदाशिव त्र्यंबकअप्पा नागठाणे यांचा वन वणवा विझवतांना मृत्यू झाला होता. त्यांना आजच्या कार्यक्रमात मरणोत्तर सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांनी या पुरस्काराचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकार केला.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दमदार नेतृत्वाखाली वन विभागाने मागील तीन वर्षात लक्षणीय काम केल्याने महाराष्ट्र वनक्षेत्रात देशपातळीवर ४ क्षेत्रात पहिल्या स्थानावर आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वनेत्तरक्षेत्रात २०१५ ते २०१७ या कालावधीत २७३ चौ.कि.मी ची वाढ झाली आहे. पर्यावरण संतुलनाच्या कामात वन विभागाने  महत्वाचा वाटा उचलला आहे. वन वाचतील ती नागरिक आणि समाजाच्या सहभागातून हे वास्तव स्वीकारून वन विभागाने लोकसहभाग मिळवला, स्वंयसेवी संस्था, संघटना, समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र केले आणि या माध्यमातून वन विकासाच्या संकल्पामागे एक मोठी फळी निर्माण केली. हे जंगल, हे वन आपलं आहे ही भावना लोकमनात निर्माण करण्यात वन विभाग यशस्वी ठरला. यासाठी वन विभागाचे सर्व अधिकारी- कर्मचारी, संयुक्त वन व्यवस्थापन समित्या अभिनंदनास पात्र असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.निसर्गाशी साधर्म्य राखून आपल्या अनेक पिढ्या वर्षानूवर्षे जगल्या. हेच संचित आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे आहे. निसर्गाशी आपलं नातं काय आहे हे सांगणाऱ्या संत तुकारामांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” असं सांगत एक बृहत परिवार निर्माण केला. त्यांचा हा शाश्वत विचार आपल्याला समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचा असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

जगण्यासाठीच्या आवश्यकतेमध्ये वन विभाग पहिला- सुधीर मुनगंटीवार

कोणत्याही राज्यात  वन विभाग प्राधान्यक्रमात शेवटून पाचवा  मानला असला तरी तो संपूर्ण जगात जगण्यासाठीच्या ज्या आवश्यकता आहेत, त्यात मात्र पहिल्या क्रमांकावर आहे असे सांगून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वृक्षाची जोपासणा हीच निसर्गाची उपासना आहे. त्यामुळे या विभागाकडे सरकारी विभाग म्हणून पाहू नये. वृक्ष लावून जगवणे हे एक ईश्वरीय कार्य आहे. पुढच्या पिढीच्या जन्मासाठी पृथ्वीवर वन ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शुद्ध आचार, शुद्ध विचार आणि शुद्ध वर्तणूकीस प्रोत्साहन देणाऱ्या आणि “वन से धन तक आणि जल से जीवन के मंगलतक” संदेश देणाऱ्या वन विभागाला पर्याय नसल्याचेही ते म्हणाले.“वने आणि शाश्वत शहरे” हे यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय वन दिनाचे घोषवाक्य आहे. शहरांमध्ये वायू प्रदुषण वाढते आहे, दाटीवाटीच्या घरांनी श्वास कोंडतो आहे, हे टाळायचे असेल तर “फॅमिली फॉरेस्ट” ही संकल्पना प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज आहे.

प्रत्येक जिल्ह्यात एक वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी असावा अशी अपेक्षा व्यक्त करून पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी वन आणि पशुसंवर्धन  व दुग्धविकास विभागाचे कार्य परस्परांना पूरक असल्याचे सांगितले. जनचळवळ काय करू शकते हे वन विभागातील वृक्ष लागवड मोहिमेने दाखवून दिल्याचेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनसचिव विकास खारगे यांनी केले. त्यात त्यांनी वनविभागाने मागील तीन वर्षात हाती घेतलेल्या अनेक महत्वाकांक्षी उपक्रमांची, उल्लेखनीय कामांची माहिती दिली. मुख्यमंत्री यांच्या हस्ते यावेळी “हरित निर्माणाची तीन वर्षे” या पुस्तकासह इतर ३ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच वन विभागाच्या विविध कामांची माहिती देणारी चित्रफीतही यावेळी दाखविण्यात आली. कार्यक्रमात वनसेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या 29 अधिकाऱ्यांचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला.