दुर्गम भागातील महिला शिक्षिका बदलीस पात्र

0
8

गोंदिया,दि.22ः-जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम आणि प्रतिकूल घोषित केलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये महिला शिक्षिकांची पदस्थापना करू नये. या ठिकाणी महिला शिक्षिका कार्यरत असल्यास त्यांना मे महिन्यात होणार्‍या बदलीस पात्र ठरवावे, असे आदेश ग्रामविकास विभागाने काढले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या शाळांतून अखेर महिला शिक्षिकांची सुटका होणार आहे.
शिक्षक भारती संघटनेचे नेते सुनील गाडगे, विजय लंके यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांची भेट घेऊन ही बाब त्यांना सांगण्यात आली होती. महिला शिक्षकांचे दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळांच्यावर काम करण्यासाठी महिला शिक्षकांची नेमणूक करू नये, अतिदुर्गम भागातील शिक्षिकांची बदली करावी, अशी मागणी करण्यात आली. दुर्गम-अतिदुर्गम भागात महिला शिक्षकांना शाळा देण्यात येऊ नये.
अशा शाळांमधून महिलांना कायमची सूट मिळावी, अशी मागणी कपिल पाटील व राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी लावून धरली असता ही मागणी मान्य करत तत्काळ महाराष्ट्रातील सगळ्या जिल्हा परिषदांना मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांना तसे आदेश पारित केले आहे.
अनेकदा निवेदने, आंदोलने करूनही शिक्षकांना बदली मिळाली नव्हती. शासकीय महिला कर्मचारी अधिकार्‍यांना सासू-सासरे आजारी असल्यास जवळच बदली करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या अनुषंगाने शिक्षिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता अखेर शासनाने दुर्गम शाळांमध्ये पदस्थापना न देण्याचा निर्णय घेतला आहे.
जी शाळा प्रतिकूल म्हणून घोषित केली आहे, तेथे महिला शिक्षकांना बदली किंवा नियुक्ती दिली जाणार नाही. याबाबत विजय लंके म्हणाले, राज्याच्या ग्रामीण विकास विभागाने काढलेल्या अध्यादेशाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या अवघड क्षेत्र, दुर्गम भागांत ज्या शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये राज्यभर किती महिला शिक्षिका कार्यरत आहेत, त्यांची त्या ठिकाणी गैरसोय होते काय, याबाबतची माहिती घेतली जात असल्याचेही विजय लंके यांनी माहिती दिली.