पहिली खाण रिलायन्सला

0
7

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बहुचर्चित कोळसा खाण लिलावाला शनिवारी सुरुवात झाली असून, शनिवारी झालेल्या दोन खाणींच्या लिलावात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स सिेमेंट कंपनीसह जीएमआर कंपनीने बाजी मारली.

ई-लिलावाच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील खाण अनिल अंबानी यांच्या रिलायन्स सिमेंट कंपनीने ७९८ कोटी रुपयांना विकत घेतली, तर ओडिशा येथील ‘तालाबिरा १’ ही खाण जीएमआर कंपनीने १३७५कोटी रुपयांत ताब्यात घेतली.

पहिला लिलाव अंबानी यांच्या कंपनीने हिंदुस्थान झिंक लिमिटेड आणि ओसीएल आयर्न अँड स्टील कंपन्यांना मागे टाकून जिंकला. छिंदवाडा (मध्य प्रदेश) जिल्ह्यातील सियाल घोगरी येथील खाणीसाठी हा लिलाव झाला. या खाणीत एकूण दोन कोटी ९३ लाख टन कोळसा असून, त्यापैकी सुमारे ५६ लाख टन कोळसा बाहेर काढण्याजोगा आहे. कंपनीने या खाणीसाठी प्रतिटन १४०२ रुपये मोजले. ही खाण पूर्वी प्रिझम सिमेंट कंपनीकडे होती. ही खाण ऊर्जानिर्मितीसाठी आरक्षित नाही. दुसरा लिलाव ओडिशातील खाणीसाठी झाला. त्यात शनिवारी रात्री जीएमआरने हा लिलाव जिंकला.

या खाणींसाठी बोली लावण्यासाठी अदानी पॉवर, एस्सार पॉवर, जीएमआर छत्तीसगड एनर्जी लिमिटेड, ओपीजी पॉवर जनरेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि सेसा स्टरलाइट लिमिटेड या पाच कंपन्यांना परवानगी देण्यात आली होती.

कोळसा खाणीवाटपामध्ये गैरव्यवहार झाल्याचे नमूद करून सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये २०४ खाणींचे वाटप रद्दबातल ठरवले होते. त्यातील १३४ खाणीं कोर्टाने नुकतीच परवानगी दिली होती.