हत्तीच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

0
8

यवतमाळ ,दि. २३ :-  नरभक्षक वाघ पकडण्यासाठी आणलेल्या हत्तीने सोंडेने उचलून आदळल्याने एक शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना राळेगाव तालुक्यातील झाडगाव-पिंपळखुटी शिवारात गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमी मजुराला यवतमाळच्या शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुभाष ललित पोटे (४५) रा. खडकी सुकळी असे जखमीचे नाव आहे. राळेगाव तालुक्यात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला. १२ जणांचे बळी घेतले. या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने मध्यप्रदेशातून एका हत्तीला पाचारण केले होते. या हत्तीवरून शोध मोहीम घेतली जात आहे. बुधवारी रात्री शोधमोहीम संपल्यानंतर या हत्तीला लोणी येथील वनचौकीत बांधून ठेवले होते. रात्री हा हत्ती साखळी सुटल्याने शेतशिवारात भटकला. गुरुवारी सकाळी सुभाष पोटे पत्नीसह झाडगाव येथे अंत्ययात्रेसाठी जात होते. झाडगाव-पिंपळखुटी शिवारात या हत्तीने अचानक सुभाषला सोंडेने वर उचलले आणि जमिनीवर आदळले. हा प्रकार पाहून घाबरलेल्या त्याच्या पत्नीने आरडाओरडा केला. दरम्यान परिसरातील नागरिक तेथे धावून आले. हत्तीला हुसकावून लावत जखमी सुभाषला राळेगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली.