कृषिमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा

0
10

अकोला,दि.24  – शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उत्पादित बियाण्यास उत्पादन व वितरणासाठीचे अनुदान सरकारकडून मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंपनी संचालकांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या खामगाव येथील घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात वाशीम जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना गुरुवारी (दि. 22) निवेदन दिले.

शेतकरी उत्पादक कंपन्यांची सरकारच्या नियम व प्रोत्साहनानुसार स्थापना करण्यात आली. प्रत्येक कंपनीत दोनशे ते अडीचशे भागधारक सभासद आहेत. अशा कंपन्यांच्या माध्यमातून वाशीम जिल्ह्यात 2016-17 च्या हंगामात शेतकरी कंपन्यांनी बियाणे उत्पादित केले.यासाठी पूर्वीपासून अनुदानाचे पाठबळ सरकार देत होते. तयार झालेले बियाणे शेतकऱ्यांना कमी दरात तसेच खात्रीशीर मिळण्याची सोय झाली होती. मात्र 27 एप्रिल 2017 रोजी निघालेल्या शासन आदेशानुसार शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी असलेले अनुदान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारने अनुदान देण्याचे टाळल्याने कंपन्या आर्थिकदृष्ट्या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. एकट्या वाशीम जिल्ह्यात 18 उत्पादक कंपन्या किंवा गट किंवा मंडळे असून त्यांच्याकडून होणारे बियाणे उत्पादन थांबले आहे. अनुदान न दिल्यास शनिवारी (दि. 31) खामगाव येथे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निवासस्थानासमोर सामूहिकरित्या आत्मदहन करणार असल्याचा इशारा कंपन्यांतर्फे दिला आहे.