पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा- महादेव जानकर

0
14

गोंदिया,दि.२४ : पशुपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुपालनाचा जोडधंदा करुन स्वत:च्या आर्थिक परिस्थितीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करावी. असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने केंद्र पुरस्कृत लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियानाअंतर्गत देवरी तालुक्यातील भर्रेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे २४ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात श्री.जानकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती विद्या खोटेले होत्या. यावेळी पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ.संजय गायगवळी, जि.प.पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शहारे, जि.प.पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राजेश वासनिक, पशुधन विकास अधिकारी डॉ.विजय कोळेकर, तहसिलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी श्री.हिरुळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.जानकर पुढे म्हणाले, राज्य व केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत अनेक योजना आहेत, त्या योजनांचा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. गोंदिया हा तलावांचा जिल्हा आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून माशाची शेती करावी. ग्रामीण भागातील नागरिकांनी कुक्कुटपालन व्यवसाय करावा. शेतकऱ्याचा मुलगा उद्योगपती कसा बनेल यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. मुला-मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती होत नाही असे सांगून ते पुढे म्हणाले, पशुसंवर्धन विभागातील रिक्त असलेली पदे लवकरात लवकर कशा पध्दतीने भरता येतील यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. लाळ खुरकूत हा गाई/म्हशींमध्ये विषाणूमुळे होणारा सांसर्गीक रोग आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. लसीकरणामुळे पशुधनाचा लाळ खुरकूत या सांसर्गीक रोगापासून बचाव होतो. त्यामुळे उत्पादनाचे सातत्य टिकून राहते व रोगमुक्त पशुजन्य उत्पादनाची निर्यात सुलभ होते. सर्व शेतकऱ्यांनी एफ.एम.डी.सी.पी. अंतर्गत लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकातून डॉ.वासनिक म्हणाले, जनावरांचे लाळ खुरकूत रोगापासून संरक्षण करण्यासाठी त्यांचे वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे गावातील सर्व जनावरांचे लसीकरण एकाच दिवशी केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. लसीकरण शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी उशीरा म्हणजेच थंड वातावरणात करावे. लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसमात्रा पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध आहेत. त्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला पशुधन विकास अधिकारी डॉ.रोहिणी साळवे, डॉ.सायली तगारे, सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ.सुनिल आकांत, डॉ.वानखेडे, डॉ.चौधरी, डॉ.येडेवार, पशुधन पर्यवेक्षक डॉ.पदम, ग्रामपंचायत सदस्य गीता पंधरे, ग्रामसेवक एस.एस.सिरसाम, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम रहिले व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ.येडेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार पशुधन विकास अधिकारी डॉ.कोळेकर यांनी मानले.